कोल्हापूर – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेल्या कोल्हापूरच्या युवा पृथ्वीराज पाटील याला आयोजकांकडून कोणतीही रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली गेली नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
कोल्हापूर येथे होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी फडणवीस कोल्हापूरात आले असून, पृथ्वीराजबाबत माहिती घेतल्यावर त्यांनी हे बक्षीस जाहीर केले. ही बक्षीस रक्कम त्याला आगामी स्पर्धांसाठी सरावासाठी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान,’महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम स्पर्धेत मुंबईच्या विशाल बनकरला आस्मान दाखवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. मात्र या स्पर्धेनंतर आयोजकांकडून रोख बक्षीस मिळालं नसल्याची खंत पृथ्वीराज पाटीलनं व्यक्त केलीय. आयोजकांकडून फक्त मानाची गदा देण्यात आली, मात्र रोख बक्षीस देण्यात आलं नाही अशी नाराजी पृथ्वीराजनं व्यक्त केलीय.