इस्लामाबाद – पाकिस्तानचा नवीन पंतप्रधान सोमवारी निवडला जाणार आहे. त्यासाठी नॅशनल ऍसेम्ब्लीत उद्या 11 तारखेला मतदान होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ, जे सध्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षनेते आहेत, ते पुढील पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या नावावर बहुतेक विरोधी पक्षांची सहमती झाल्याचे मानले जाते.
तथापि ही खुली मतदान पद्धती असल्याने त्यावेळीही इम्रान खान यांच्या समर्थकांकडून काही खेळी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही निरीक्षकांचे मत आहे. सत्तेत येणाऱ्या नव्या सरकारकडेही जेमतेम बोटावर मोजण्या इतक्या मतांचेच बहुमत असणार आहे. त्यामुळे त्या सरकारलाही उर्वरीत कार्यकाळ पुर्ण करता येईल की नाही याविषयीही काही जण आत्ता पासूनच शंका व्यक्त करू लागले आहेत.