खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

दोघांना अटक : कामशेतमधील व्यापाऱ्याला धमकावले

कामशेत – कामशेत शहरातील एका व्यापाराला खंडणी मागितल्या प्रकरणी कामशेत पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुराग सुरेश गदिया (वय-29, रा. रेल्वे स्टेशन जवळ, कामशेत ता. मावळ, जि. पुणे) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चॉकलेट शिंदे, दिग्या शिंदे, अनिकेत शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही. सर्व रा. कामशेत गावठाण, ता. मावळ) व दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. कामशेत पोलिसांनी कारवाई करत दिग्या शिंदे, अनिकेत शिंदे यांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी अद्याप फरारी आहे. गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी (एमएच 14, जीएस 5294) जप्त करण्यात आली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 8) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंडित नेहरू शाळेजवळ आरोपींनी अनुराग यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत घातले. त्यातील एकाने अनुराग यांच्या डोक्‍यास पिस्टल लावले.

नंतर तेच पिस्टल अनिकेत शिंदेने अनुरागच्या कमरेला लावून हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला पवनानगर धरणाकडे नेऊन आरोपींनी अनुरागकडून खंडणी म्हणून 1 कोटी रुपयांची मागणी केली. त्यामध्ये तडजोडीअंती 25 लाख खंडणी ठरवली. खंडणीचा पहिला हफ्ता म्हणून 10 लाख रुपये बुधवारी (दि. 10) कामशेत येथे देण्यास सांगितले होते.कायमस्वरूपी हप्ता देण्यास धमकावून ते न दिल्यास अनुराग व त्यांच्या कुंटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील
करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.