वॉटर कप स्पर्धेत पठारवाडी तालुक्‍यात प्रथम

बाभूळगाव द्वितीय; कुंभेफळने पटकावला तृतीय क्रमांक

कर्जत  – दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये कर्जत तालुकास्तरावर पठारवाडी गावाने प्रथम, बाभुळगावने द्वितीय तर कुंभेफळ गावाने तृतीय क्रमांक पटकावला. तालुक्‍यातील अनेक गावांनी या स्पर्धेत भाग घेत लोकसहभागातून विविध कामे केली होती. रविवारी पुणे येथील कार्यक्रमात या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

कर्जत तालुक्‍यातील पठारवाडी या बहिरोबावाडी ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गावाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. सरपंच विजय तोरडमल यांनी हे बक्षीस माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमधील कलाकाराच्या हस्ते स्वीकारले. यावेळी अमीर खान, किरण राव, सत्यजीत भटकळ आदी मान्यवर उपस्थित होते. पठारवाडी या गावाने मोठे श्रमदान करत अनेक जलसंधारणाची कामे केली होती. महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाचे आयोजन केले होते. त्यावेळी पाणी फाउंडेशनचे सत्यजीत भटकळ यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली होती.

कर्जत तालुक्‍यातील भारतीय जैन संघटना, रोटरी क्‍लब, तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, कर्जत नगरपंचायत, विविध शाळा महाविद्यालये तसेच सामाजिक संघटना यांनी पठारवाडीमध्ये सातत्याने श्रमदान केले होते. कर्जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील या छोट्या गावाने या स्पर्धेच्या निमित्ताने मोठी एकजुट दाखवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. बक्षीसपात्र ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे यानिमित्ताने अभिनंदन केले जात आहे.

स्पर्धेत मिळालेले यश हे सर्व गावकऱ्यांचे असुन त्यांनी दाखवलेली एकजुट मोलाची होती. गावाबाहेरील अनेकांनी येथे येऊन सातत्याने श्रमदान केले. अनेकांनी कामासाठी उपयुक्त साधनसामग्री तसेच आर्थिक मदतही केली.

विजय तोरडमल, सरपंच, बहिरोबावाडी. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here