आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

नगर – भाऊ-बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षांबधन. येत्या गुरुवारी (दि.15) रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन सोबतच येत असून, या दिवसाच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला शासकीय सुटी नसते, पण यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच रक्षाबंधन आल्यामुळे यावर्षी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे राखी व गिफ्ट खरेदीसाठी सर्वच बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
यावर्षी बाजारात विविध राख्या आल्या असून, बच्चेकंपनीसाठी पण गमतीशीर राख्या बाजारात आल्या आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून रक्षाबंधनासाठी बाजारात राख्या उपलब्ध झाल्या होत्या. रक्षाबंधन तीन दिवसांवर आल्यामुळे आता बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात यंदा विविध कलाकुसरीने नटलेल्या राख्या बघायला मिळत असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा राखीला मोठी मागणी मिळत आहे. यावर्षी राख्यांच्या किमतीत किरकोळ प्रमाणात वाढ झाली असून, 24 रुपये डझनपासून ते 500 रुपये डझनपर्यंत राख्या बाजारात मिळत आहे. शहरातील ठिकठिकाणी राख्यांची दुकाने सजली आहेत.

भावा-बहिणीसाठी कपलराखी, मोठ्यांसाठी बुलबुल राखी तसेच चांदीची मुलामा असलेल्या राख्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या राख्या दहा रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत मिळत आहे. तसेच स्टानेवाली राखी 40 रुपयांपासून पुढे मिळत आहे. याचप्रमाणे हाताने बनविण्यात आलेली जरदीसी राखी 50 रुपयांपासून पुढे मिळत आहे, तर भावाला व वहिनीला बांधली जाणारी लुंबा राखी यार्वर्षी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या दिवशी एकमेकांप्रती प्रेम, भावना, आदर व्यक्त करण्याचा तसेच भावाच्या हाताला धागेबंधन बांधून त्याच्याकडून आयुष्यभराचे संरक्षणाचे वचन घेण्याचा हा दिवस असतो.

लहान मुलांसाठी खास राख्या

गतवर्षीपेक्षा यावर्षी लहान मुलांसाठी खास राख्या आल्या असून, यामध्ये लाइट सिनर राखी, म्युझिक राखी, तिरंगा राखी, पबजी राखी, डोरेमॅन राखी, मोटू पतलू राखी, पॅडमॅन राखी, अवेन्जर राखी, अँग्री बर्ड राखी, छोटा भीम, कृष्णा राखी, गणपती राखी, चांदीची राखी, रुद्राक्ष राखी यांसारख्या विविध राख्या बाजारात दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.