दिवाळीत फटाके वाजणार ; बहुतेक कंपन्यांकडून पगार कपात मागे

नवी दिल्ली : देशात करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनने सर्वच क्षेत्रांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली होती. मात्र, आता हळूहळू सर्वच गोष्टी पूर्वपदावर येत असल्याने यांपैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत. त्यामुळे बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ही आनंदात जाणार असल्याचे दिसत आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये काही विभागांनी कर्मचाऱ्यांचे कमी केले पगार पूर्ववत केले आहेत. त्याचबरोबर कोविड लॉकडाउनच्या काळात चांगल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्सकडून परफॉर्मन्स बोनसही देण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी वृत्त दिले आहे. इंधनापासून टेलिकॉम क्षेत्रात विविध नोकऱ्या उपलब्ध करुन देणाऱ्या रिलायन्स कंपनीने पुढील वर्षाच्या पगारामध्ये ३० टक्के अॅडव्हान्स देण्याचाही विचार करीत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी करोनाच्या काळात काम केले अशा लाखो कर्मचाऱ्यांना सद्भावना म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, गेल्या तीन आठवडयांपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माईंडट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी नवी पगारवाढ जाहीर केली आहे. तसेच सणांच्या काळात बोनसही देणार असल्याचे म्हटले आहे. अनेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा कंपन्याही पगार कपात मागे घेण्याचा विचार करीत आहेत.

करोना लॉकडाउनचा या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला होता. या काळात या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या तर अनेकांना मोठ्या पागार कपातीला सामोरे जावे लागले होते. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ आणि बोनसचाही विचार करीत आहेत. फार्मा, कॉन्झुमर फूड आणि टेक्नॉलॉजी सारख्या ज्या क्षेत्रांनी करोनाच्या काळात चांगली कामगिरी केली. त्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस देण्याच्या विचारात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.