इस्लामाबाद : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लामबद्दल द्वेष निर्माण करणारा मजकूर पोस्ट करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. त्यांनी त्यासाठी थेट फेसबुकचे सीईओ मार्क झूकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे.
इम्रान यांनी सोमवारी टि्वटवरुन मार्क झूकरबर्ग यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. मुस्लिमांमध्ये कंट्टरपंथीय भावना वाढीस लागेल, असा इशाराही इम्रान खान यांनी दिला आहे. वाढत्या इस्लामोफोबियामुळे कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळत आहे तसेच जगभरात हिंसाचारही वाढीस लागणार आहे. खासकरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून या इस्लामफोबियाला चालना मिळतेय असे इम्रान यांनी मार्क झूकरबर्ग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी ते पत्र टि्वटरवर शेअर केले आहे.
“होलोकॉस्ट म्हणजे ज्यूंच्या नरसंहाराशी संबंधित कुठलाही कंटेट फेसबुकवर पोस्ट करण्यावर बंदी घालण्याचा तुमचा निर्णय योग्य आहे, तसेच इस्लामफोबियाशी संबंधित पोस्टवरही बंदी घाला” अशी मागणी इम्रान यांनी केली आहे.
होलोकॉस्टप्रमाणेच इस्लामोफोबियावर बंदी घालण्याची मागणी करताना इम्रान खान यांनी टि्वटमध्ये भारत आणि फ्रान्सवरही टीका केली आहे. हे दोन्ही देश मुस्लिमांबद्दल भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारताने सीएए-एनआरसी कायदा लागू केला, त्यामुळे मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. फ्रान्सवरही त्यांनी इस्लामफोबियाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.