मुंबई – चित्रपट निर्माता अभिनव कश्यप याने नुकतेच सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करियर बर्बाद केल्याचा गंभीर आरोप केला होता. “दबंग’च्या डायरेक्टरने एका फेसबुक पोस्टमधून अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. याबाबत आता सोहेल खाननेही ऍक्शन घेतली आहे. यातच पुन्हा फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित अभिनवने त्याच्या मनातील खदखद बोलून दाखवली. या खळबळजनक पोस्टमध्ये त्याने सलमानच्या बिंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो असं अभिनवने म्हटलं आहे. अभिनवने पोस्ट लिहिली आहे की,’ गुंडगीरी केल्यामुळे सलमानवर अनेक गुन्हेगारी खटले सुरु होते. परिणामी सलमानची प्रतिमा मलिन होत होती. या प्रतिमेतून सलमानला बाहेर काढण्यासाठी वडिल सलीम खान यांनी बिंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली. आज ही संस्था ५०० रुपयांची जीन्स ५०००रुपयांना विकते. तसंच या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो.. अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्याने लिहिली आहे. अभिनवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.