कल्याणी फडके
पुणे –“योगा’ ही भारतातील प्राचीन विद्या आहे. योग हाच निरोगी आरोग्याची “प्रार्थना’ आणि “नियम’ आहे. मात्र, मध्यंतरी अनेकांना याचा विसर पडला होता; परंतु आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगभरामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार झाला. धकाधकीच्या जीवनामध्ये योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा (मेडिटेशन) करणे प्रभावी ठरत आहे. याशिवाय सध्या वाढते नैराश्य कमी करण्यासाठीदेखील ध्यानधारणेचा सकारात्मक परिणाम होत असून दिवसेंदिवस योगाभ्यासाचे महत्त्व वाढत असल्याचे मत योग अभ्यासकांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्त केले.
2015 पासून जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस सुमारे 150 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा करण्यात येतो. केवळ योग दिनापुरतेच नव्हे तर, अनेक गंभीर आजारांवर योगोपचाराचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. योगासने आणि सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे. यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थिरता प्राप्त होते. बाह्य आणि अंतर्गत अवयवांना याचा उपयोग होतो. यामुळे सुदृढतेबरोबर एकाग्रता वाढण्यासाठी देखील मदत होते. योग करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसून, अबालवृद्धांना योगासने करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व वाढत असून, परदेशी नागरिक योगासाठी भारतामध्ये येत आहेत, असे अभ्यासकांनी सांगितले.
योगासनामध्ये सूर्यनमस्कारांचे महत्त्व अधिक आहे. सूर्याच्या नामांचे स्मरण करून सूर्यनमस्कार केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. यातून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. याशिवाय ताकद, हाडांची बळकटी, लवचिकता आणि एकाग्रता यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त ठरतात, असे अभ्यासकांनी नमूद केले.
सध्या योगाकडे पाहण्याचा “ट्रेन्ड’बदलत आहे. पूर्वी योगाकडे फॅशन म्हणून पाहण्यात येत होते. मात्र, आता शरीर आणि मनाचे स्वास्थ्य संतुलन आणि निरोगी ठेवण्यासाठी “योगाभ्यास’ म्हणून पाहिले जात आहे. “योग शिकू अन् शिकवू’ या हेतूने अनेक जण योगाचा प्रसार करत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यासाठी योगासने, सूर्यनमस्कार सातत्याने करत आहेत. आत्तापर्यंत योगाचा अवलंब होत नव्हता, याचे वाईट वाटायचे, पण नागरिकांना त्याचे गांभीर्य समजले असून महत्त्व लक्षात आले आहे, ही नक्कीच समाधानकारक बाब आहे.
– राधिका खांदवे, योग प्रशिक्षक