पुन्हा मुजोरी ! चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये वसवले तब्बल १०१ घरांचे गाव

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि भारतातील सीमावाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. कारण चीनने भारताच्या हद्दीत पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. यावेळी चीनने अरूणाचल प्रदेशात गावच वसवलं आहे. समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली आहे. चीनने तब्बल १०१ घरं बांधली असून, भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीनने हे बांधकाम केल्याचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीनने अरुणाचलमध्ये हे गाव वसवले असून, इंग्रजी वृत्तवाहिनीने या छायाचित्रांची तज्ज्ञांकडून पडताळणी केल्यानंतर वृत्त दिले आहे. हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. चीनने सीमा ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवले आहे. या गावात १०१ घरं बांधले असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीनने कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचे दिसत आहे. अरुणाचल प्रदेशात असलेल्या अप्पर सुबनशिरी जिल्ह्याच्या हद्दीत हा भूभाग येतो. त्सारी चू नदीच्या काठावर चीनने हे गाव वसवले असून, या भूप्रदेशावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशांकडून या भागाला सशस्त्र लढाईची जागा म्हणून अधोरेखित करण्यात आलेलं आहे.

पूर्व लडाखमध्ये गेल्या मे महिन्यापासून भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे, हा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. मात्र, चीनकडून सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. चीननं गाव वसवल्यानं भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.