नवी दिल्ली – करोना विषाणूंच्या प्रभावाने संपूर्ण पृथ्वी व्यापली जाण्याचा धोका समोर असताना याची लागण झालेल्यांच्या उपचारांसाठी तसेच सरकारी यंत्रणांच्या प्रयत्नांना मदत म्हणुन जगभरातील क्रीडापटू आपला वाटा उचलत आहेत. भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेही यात आपला सहभाग घेत पंतप्रधान सहाय्यता निधीला 31 तर उत्तर प्रदेश राज्य सरकारला 21 लाख रुपयांची मदत दिली आहे.
करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. देशातील सर्व संशोधक, शास्त्रज्ञ व्यापक प्रयत्न करत असून त्यांना यश आले तर देशवासियांचे आयुष्य वाचणार आहे, त्यांच्या याच प्रयत्नांना मदत म्हणुन रैनाने ही मदत केली आहे.करोनावर अद्याप कोणतेही शाश्वत औषध हाती लागलेले नाही. दर दिवशी करोनाची लागण झालेले आणखी रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी निधी कमी पडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यालाच प्रतिसाद देत रैनाने केवळ वैयक्तिक मदतच केली नाही तर आपल्या देशातील अनेक क्रीडापटूंनीही पुढे येत मदत करावी असे आवाहनही केले आहे. याची माहिती त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केली.
नुकताच पिता बनलेला रैना देशातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत अनेक क्रीडापटूंसाठी आदर्श बनला आहे. रैनाच्या पूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी, युसुफ पठाण, इरफान पठाण या क्रिकेटपटूंसह बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया, टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा व धावपटू हिमा दास या खेळाडूंनीही करोनाग्रस्तांना मदत केली आहे.