हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. या रोगांमुळे नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे.
सुरुवातील उशिरा पाऊस झाला त्यामुळे पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर सोयाबीन पिकावर गोगलगायींचे संकट आणि आता यलो मोझॅकने सोयाबीनवर हल्ला चढवला आहे . त्यामुळे उत्पन्नच होणार नसल्याने अनेकांवर पीक उपटून टाकण्याची वेळ आली. जोमात आलेल्या सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’ या विषाणुजन्य रोगाने हल्ला चढवल्याने पीक पिवळे पडून करपले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा खडकी धोतरा साखरा बोरखेडी कापडशिंगि घोरदरी उटी ब्रम्हचारी हत्ता नाईक यासह तालुक्यातील अनेक गावात सध्या सोयाबीन पिकांवर यलो मोझॅक हा रोग पसरला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील ढगफुटी सदृश पाऊस पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन , कापूस यासारखी पिके आडवी झाली त्यात आता उरलेल्या सोयाबीनवर यलोमोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने सेनगाव तालुक्यातील पूर्णच गावातील पंचनामे करून शेतकऱ्यांला तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.