कौटुंबिक वादातून पत्नी व मुलाचा खून

राहुरी: वांबोरी येथे आज (दि.26) दुपारी साडेतीन वाजता पतीने कौटुंबिक वादातून पत्नी व स्वतःच्या सात वर्षांच्या मुलास ठार मारले. यानंतर आरोपीनेही विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीला राहुरी पोलिसांनी अटक केले आहे.

भारत ज्ञानदेव मोरे (वय 35, रा. मोरेवाडी, वांबोरी) असे आरोपीचे नाव आहे. संध्या भारत मोरे (वय 30) व साई भारत मोरे (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.

आरोपी भारत मोरे याने रागाच्या भरात लाकडी क्रिकेट बॅटच्या फळीने पत्नी संध्या व मुलगा साई यांच्या डोक्‍यावर वार केले. दोघेही जागेवर कोसळले. आरोपी घाबरून उसाच्या शेतात जाऊन लपला. शेजारच्यांनी जखमींना वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उसाच्या शेतात लपलेल्या आरोपी भारत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.