मशागतीची लगीनघाई !, भात पेरणीपूर्वी मावळात लगबग

भात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

कामशेत – भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण 16 जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या 10 वर्षांतील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्‍यक आहे. तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे.

भात हे मावळ विभागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे चांगल्या उत्पन्नासाठी सुधारित संकरीत वाणाचे बियाणे शासकीय यंत्राणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडून खरेदी करावे. शेतकरी बंधूही भात पीक नियोजनामध्ये व्यस्त आहेत. परंतु त्यांनी भात बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे तितकेच आवश्‍यक आहे.

मावळातील भात उत्पादकांची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी भात रोपवाटिका पेरतात. भात रोपवाटिका पेरणीसाठी अनेक शेतकरी बियाण्याच्या दुकानातून भात बियाणे विकत घेतात. या वेळी दुकानदारांकडून वेगवेगळ्या वाणांचे सुट्टे बियाणे शेतकऱ्यांना विकतात आणि हे बियाणे व्यवस्थित न उगविल्यास बियाण्याची पावती नसल्याने शेतकऱ्यास न्याय मिळत नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

बियाणे खरेदी करताना अशी काळजी घ्या…

– बियाणे मान्यता प्राप्त व योग्य त्या प्रकारची खरेदी करावी.
– बियाण्याच्या पिशवीवर लेबल व शील असावे
– लेबलवर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी
– बियाणे खरेदीची पावती घ्यावी
– लेबलवर बियाण्याची जात प्रकार लॉट क्रमांक उगवण शक्‍ती, अनुवांशिक शुद्धता बियाणे वापराचा अंतिम दिनांक यांचा उल्लेख असावा.

खरीप हंगामासाठी भाताची पेरणी 15 मे ते 25 जूनपर्यंत करावी पेरणीकरिता 1 ते 1.20 मीटर रुंद व 8 ते 10 से.मी. उंच व आवश्‍यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत, गादी वाफे तयार करणे शक्‍य नसेल, तर रोपवाटिका तयार करण्यासाठी थोडी उंचवटीची जागा निवडावी व चारही बाजूनी खोलगट चरी काढावी त्यामुळे जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.

रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रती आर 1 किलो युरिया खत घ्यावे. पावसाच्या अभावी व अन्य कारणाने लावणी लांबणीवर गेली, तर अशा वेळी दर आर क्षेत्रास एक किलो क्षेत्राचा तिसरा हप्ता घ्यावा.

बी पेरल्यापासून ते उगवेपर्यंत बेताचे पाणी हवे किंबहुना केवळ ओलावाच हवा, अतिवृष्टीमुळे रोपवाटिकेत पाणी साचल्यास उगवण योग्य प्रमाणात होत नाही, तसेच बी कुजण्याची शक्‍यता असते, यामुळे छोटे नाले काढून अतिरिक्‍त पाणी बाजूला काढावे. पाण्याचा निचरा झाल्याने रोपांच्या मुळांना प्राणवायूचा भरपूर पुरवठा होतो व त्याची वाढ जोमदार होण्यास मदत होते.

“भात उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारित बियानांचा वापर करावा, सुधारित वाण वापरल्यास अधिक उत्पादन मिळण्याची खात्री मिळते. मावळात इंद्रायणी, फुले समृद्धी, भूगावती, फुले राधा या वाणांचा वापर होत असला तरी प्रामुख्याने इंद्रायणी, फुले समृद्धी हे प्रमुख सुधारित वाण आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक वाणाचा वापर करू नये, हे वाण रोगांचा प्रार्दूभाव होतो. त्यामुळे उत्पादनात घट होते. बीजप्रक्रिया करून ओळीत पेरणी अपेक्षित आहे. तसेच गादीवाफे करून पेरणी केल्यास भातरोपाची पुन:लागवड जोमात होऊन पर्यायाने उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत मिळते.
– डॉ. नरेंद्र काशिद, प्रमुख अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव.

संकरित वाणाचे बियाणे…

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सुधारित व संकरित वाणाचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रातूनच खरेदी करावे, लागवड करताना योग्य शुद्ध निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे, लावणी पद्धतीसाठी 30 ते 40 किलोग्रॅम प्रति हेक्‍टरी या प्रमाणात बियाणे वापरावे संकरित जातींसाठी हेक्‍टरी 20 किलोग्रॅम बियाणे वापरावे, सुधारित वाणांमध्ये आढळणारी प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या जाती कमी उंचीच्या न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत, पाने जाड रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असल्यामुळे कर्ब ग्रहणाची कार्य अधिक प्रभावीपणे होते, तसेच शेंडे पान व त्या खालील पाने दीर्घ काळापर्यंत हिरवी व कार्यक्षम राहतात. त्यामुळे पानातील लोम्बीत पळींजचे प्रमाण कमी राहते. चुडांना कमी प्रमाणात फुटवे येतात आणि त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत निसवतात यामुळे भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) अधिक मिळते.

घरगुती बियाणे असेल, तर अशी राखा निगा…

शेतकरी घरचे बियाणे वापरणार असतील, तर (बीजप्रक्रिया); भाताचे बी निरोगी व वजनदार असावे. त्यासाठी भात बियाण्यास तीन टक्‍के मिठाच्या द्रावणाची म्हणजे 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ विरघळून द्रावण तयार करावे व त्यात बी बुडवावे, यावेळी पाण्यावर तरंगणारे हलके बी नंतर काढून जाळून टाकावे. तळाशी राहिलेले जड बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे, त्यानंतर बुरशीनाशक तसेच अनुजीव नाशकांची बीजप्रक्रिया करावी, करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्त आणि आभासमय काजळी या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम किंवा बेनलेटप्रती किलो बियाण्यास तीन ग्रॅम या प्रमाणे चोळावे, पेरणीपूर्वी अर्धातास बीजप्रक्रिया करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.