मुंबई – उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार लक्षात येताच एकच खळबळ उडाली आहे.
त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून सर्व विभागांना अधिकृत मेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. गृह विभागाकडून तसे परिपत्रक काढण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचाही वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणावर गृह विभाग आता खडबडून जागे झाले आहे. आता प्रत्येक विभागास जीमेल, आणि इतर खाजगी मेलचा वापर करता येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि त्यांचे खाजगी सचिवांचे बनावट ईमेल खाते तयार करून सदर ईमेल खात्याद्वारे, विद्युत विभागाशी संबंधित ६ अभियंत्यांच्या बनावट बदलीचे आदेश विद्युत विभागाला ईमेल करण्यात आले. बदली आदेशांवर उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर बनावट स्वाक्षऱ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.