पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – कंत्राटी कामगारांच्या वेतनाची माहिती संगणकीय प्रणालीवर आणून त्यामध्ये पारदर्शीपणा आणण्याचे पाऊल पुणे महापालिकेने टाकले आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका त्या बाबत उदासिनच दिसत आहे. कंत्राटी कामगारांच्या वेतनाची माहिती संगणकावर अपलोड न केल्याने कामगारांची ठेकेदारांकडून लुबाडणूक होत आहे. अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे कामगारांना आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
महापालिका ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने कामगारांची नियुक्ती करून त्यांच्याकडून विविध कामे करून घेत आहे. या कामगारांचे वेतन ठेकेदारांमार्फत होत असते. ठेकेदारांना महापालिकेकडून बिले अदा केली जातात. नवीन कायद्यानुसार कामगारांच्या खात्यावर पैसे जमा केले जाऊ लागले आहेत. काही ठेकेदार कामगारांचे एटीएम, पासबुक स्वतःकडेच ठेऊन कामगारांच्या पैशांवर डल्ला मारत असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. कामगारांना ठेकेदार पुर्ण वेतन देत नसल्याच्या तर वारंवार तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून पुणे महापालिकेने परिपत्रक काढत कामगारांच्या वेतनाची माहिती देण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत केली आहे.
यामध्ये कामगारांचे एकूण वेतन किती आहे, ते खात्यावर जमा झाले की नाही, कामगारांना वेतन मिळाले की नाही? या बाबत अद्ययावत माहिती संगणकावर नमूद केली जात आहे. कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये पारदर्शीपणा यावा, या उद्देशाने हे करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मात्र या बाबतची यंत्रणा अद्यापही विकसीत केली नाही. त्यामुळे शहरातील कामगारांना वेतनाबाबत संपुर्ण माहिती मिळत नाही. दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनातून काही रक्कम ठेकेदाराकडून घेतली जात आहे. नोकरी जाण्याच्या भितीने ठेकेदारांकडून होणारा अन्याय गप्प राहून कामगारांना सहन करावा लागत आहे. या बाबत महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही परिपत्रक काढून पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे.
पुणे महापालिकेची स्वतंत्र संगणक प्रणाली
पुणे महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, कंत्राटी कामगारांसाठी लेपीींरलींशाश्रिूेशश.िाल.ळप ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सर्व विभागाकडील प्रमुखांनी ऑनलाईन युजर आयडी आणि पासवर्ड कामगार सल्लागार यांच्यामार्फत घ्यावे. त्या अनुषंगाने विभागातील निविदाधारकांची माहिती व कंत्राटी मनुष्यबळाच्या कंत्राटी सेवकांच्या वेतनाबाबतचा डाटा एन्ट्री करणे अपेक्षीत आहे. त्यामध्ये कामगारांचे दर महिन्याचे वेतन केल्याबाबतची माहिती संगणकावर अद्ययावत केली जात आहे.