देहूरोड, दि. 12 (वार्ताहर) -डॉक्टर व रुग्णालयामध्ये दहशत निर्माण करीत डॉक्टरांविरुद्ध दूषित वातावरण निर्माण करून बदनामी पसरविण्याऱ्या व्यक्तविरुद्ध कारवाई करण्याची मागणीसाठी देहूरोड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि.12) मूक मोर्चा काढण्यात आला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.
देहूरोड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश कुदळे, डॉ.अशपाक बांगी, डॉ. नितीन महाजन, डॉ. एस. एस. बंसल, डॉ.विजय चौधरी, डॉ. सुदीप रसाळ, डॉ.भूषण कुलकर्णी, डॉ. विजय चौधरी, डॉ. संकल्प महाजन यांच्यासह सुमारे 50 हून अधिक वैद्यकीय व्यावसायिक मूक मोर्चात सहभागी झाले होते. निषेधाचे फलक घेऊन देहूरोड येथील बंसल रुग्णालयापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मुंबई पुणे महामार्गाने मोर्चा देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला.
अमीन शेख या सराईताने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भडकावणे, बिल न भरता जबरदस्तीने रुग्णांना घेऊन जाणे, डॉक्टरला धमकावणे, पैशाची मागणी करणे, सोशल मीडीया तसेच अनधिकृत बदनामीकारक बॅनर सार्वजनिक चौकात लावणे, पत्रके वाटणे. या प्रकारे देहूरोड शहरात दहशत निर्माण करीत आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण असून जीवास धोका संभावित असल्याने त्याच्या विरुद्ध डॉ.अशपाक बांगी व डॉ. नितिन महाजन यांनी जीवनरेखा हॉस्पिटलतर्फे देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.