मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणाने कलाटणी घेतल्याचे दिसत आहे. त्यातच एकनाथ खडसे विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीमध्ये खडसे प्रवेश करणार हे समजल्यापासून ते प्रवेश करेपर्यंत भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. याच टीकेला आता एकनाथ खडसे उत्तर देताना दिसत आहेत. खडसेंना राष्ट्रवादीत चॉकलेट मिळतं की, लिमलेटची गोळी? हे आम्हाला पण पाहायचे आहे, असा चिमटा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला होता. त्याला स्वतः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीच उत्तर दिले आहे.
“अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे, जे गाडीभर नव्हतेच. ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला, त्यावेळी मी मोर्चात नव्हतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटे अजित पवारांसोबत शपथ घेतली. त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत आहेत,” अशी टीका खडसे यांनी केली.
खडसे म्हणाले, “मी जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट झाले होते. त्यावेळी मला थांबवण्यासाठी का आग्रह केला नाही? मला थांबवण्यासाठी कुणाचा फोन आला नाही. एकदा चंद्रकांत पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही, त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही. भाजपामध्ये मोठ्या संख्येने लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का?,” असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे.
“माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येत आहेत, हे महत्वाचे नाही. किती लोक निवडून आणू शकतो, हे महत्वाचं आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र १०-१२ माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील,” असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.