मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. या आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातून आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
अशातच शिवसेना नेत्यांकडून यावरून आपली भूमिका स्पष्ट केली जात आहे. यातच शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री बनराव घोलप यांनी माध्यमांशी बोलतांना धनुष्यबाण नसला तरी जे चिन्ह मिळेल त्याने विरोधकांचा काटा काढू अस म्हणत आपली भूमीका स्पष्ट केली आहे.
ते पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना आता नवी राहिलेली नाही. छपन्न वर्षे शिवसेना जनमाणसात काम करते आहे. आम्ही कोणतेही चिन्ह घेतले तरी त्याला लोकप्रिय होण्यास काहीच वेळ लागणार नाही. शिवसेना जे चिन्ह देईल ते लोक अतिशय प्रेमाने स्विकारतील. धनुष्यबाण नसला तरी जे चिन्ह मिळेल त्याने विरोधकांचा काटा काढू, असेही ते म्हणाले आहे.