मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे.
या आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातून आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. तर शिवसेना पक्षातील नेत्यांकडूनही शिंदे गटावर टीका केली जात आहे. अशातच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर टीका करत ‘चार दिन की चॉंदनी’ म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’शिंदे गट ही भाजपाची बी टीम झाली असून, त्यांचा फक्त वापर करण्यात येईल. शिंदे गट म्हणजे ‘चार दिन की चॉंदनी’ आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे प्रत्येक शिवसैनिकाचे रक्त सळसळत आहे. अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीत मिळेल त्या चिन्हावर लढून, त्यांना उत्तर देणार’ असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.