उष्णतेची लाट येण्याअधीच पुणे शहर तापले

पारा 41 अंशांवर : मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट

पुणे – “शहरात पुढील तीन दिवसांत उष्णतेची लाट येईल,’ असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, त्याआधीच शहरातील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्यामुळे रविवारी (दि. 19) शहर चांगलेच तापले होते. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही दुपारी शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. बाजारपेठाही शांत होत्या.

मागील आठ दिवसांपासून शहरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे 35 अंशांपर्यंत खाली आलेले तापमान पुन्हा झपाट्याने वाढले असून, आज 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शनिवारी (दि. 18) शहरात 40 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. 24 तासात एक अंशाने वाढ झाल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली असून, आकाश निरभ्र असल्यामुळे गरमाईने नागरिक हैराण झाले आहे.

सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. भर दुपारी माथ्यावर सूर्यनारायण आल्यावर अंगाची लाहीलाही होत आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान उन्हाचा तीव्रता कमी जाणवत होती. परंतू, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणही गायब झाल्यामुळे उन्हाच्या चटका आणि उकाडा वाढला आहे. रात्री हवेतील गारवा कमी झाल्यामुळे उकाडा असह्य होत आहे. दरम्यान, दि. 20 तारखेनंतर शहरातील कमाल तापमानात एक ते दोन आणि किमान तापमान दोन अंशाने वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येणार असून, नागरिकांनी सतर्क रहावे.

उष्माघातापासून सावध रहा…!
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची भीती अधिक असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. या तळपत्या उन्हात दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये. घर, ऑफिस किंवा अन्य सावलीच्या ठिकाणी शांत बसावे. पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आहार घ्या. विशेषत: लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी. उन्हामध्ये फिरणाऱ्या व्यक्तींनी चक्कर येणे, पोटदुखी, डोकेदुखी, डोळ्यासमोर अंधारी येणे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ सावलीत बसून, पाणी किंवा लिंबू सरबत प्यावे, त्यानंतर डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.