अंकारा, (तुर्कीये) – तुर्कीयेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रेसिप इर्दोगन हे पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडले गेले आहेत. गेल्या दोन दशकांपासून इर्दोगन हे तुर्कीयेचे अध्यक्ष असून आता पुन्हा अध्यक्षपदी निवडले गेल्यामुळे त्यांच्या एकाधिकारशाहीच्या राजवटीचे तिसरे दशक सुरू झाले आहे. देशातील वाढती महागाई आणि भीषण भूकंपामुळे भुईसपाट झालेली अर्थव्यवस्था हे तुर्कीये पुढील आव्हान असतानाच इर्दोगन यांची पाचव्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
रविवारी झालेल्या मतदानाची रात्री उशिरा मोजणी झाली. एकूण मतदानापैकी 99 टक्के मतपेट्यांची मोजणी झाली तेंव्हा इर्दोगन यांनी 52 टक्के मते मिळवून प्रतिस्पर्धी केमाल केलिंगदारोग्लू यांच्यावर विजयी आघाडी घेतली होती. देशातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी देशवासियांना धन्यवाद दिले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या केमाल केलिंगदारोग्लू यांची “बाय, बाय केमाल’ अशा शब्दात इर्दोगन यांनी कुचेष्ठा देखील केली.
आजच्या निवडणुकीत केवळ तुर्कीये विजयी झाली आहे, असे इर्दोगन म्हणाले. तुर्कीयेच्या स्थापनेची या वर्षी शताब्दी साजरी होत आहे. त्यामुळे तुर्कीयेच्या दुसऱ्या शतकात अधिक कठोर कष्ट घेण्याचे वचनही त्यांनी देशवासियांना दिले. जगभरातील कोणीही आपल्या देशाला कमी लेखू शकणार नाही, असेही ते म्हणाले. रात्री उशिरा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर इर्दोगन यांच्या समर्थकांनी राजधानी इस्तंबुलच्या रस्त्यांवर जल्लोष केला.
या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इर्दोगन यांना स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या. हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओरबान यांनी ट्विटरवरून इर्दोगन यांचे अभिनंदन केले आहे. कतारचे राजे शेख तमिम बिन हमाद अल थानी यांनीही इर्दोगन यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय अझरबैजान, पाकिस्तान, लीबिया, अल्जेरिया, सर्बिया आणि उझबेकिस्तान या समविचारी देशांच्या प्रमुखांनीही इर्दोगन यांचे अभिनंदन केले आहे.
एकाधिकारशाहीची पाचवी टर्म
इर्दोगन यांच्या आर्थिक नियोजनामुळे तुर्कीयेतील महागाई प्रचंड वाढली आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. भीषण भूकंपानंतर मदत आणि पुननिर्माणाच्या कामाचा संथ वेग यामुळेही अनेकजण नाराज झाले आहेत. या भूकंपामुळे झालेली हानी इतकी प्रचंड असूनही इर्दोगन प्रशासन त्याबाबत अतिशय निष्काळजी आहे. त्यामुळे लाखो लोकांना भूककंपानंतर 3 महिन्यांनंतरही उघड्यावरच रहावे लागते आहे. तुर्कीयेत कट्टरवाद फोफावू लागला आहे. तसेच आशिया आणि युरोपातील देशांबरोबर तुर्कीयेची समिकरणे बिघडली आहेत. पाकिस्तान, चीन, रशिया आणि अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीशी इर्दोगन यांचे विशेष घट्ट संबंध आहेत. त्यामुळे इर्दोगन यांच्या राजवटीविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाराजी होती. मात्र देशांतर्गत एकाधिकारशाहीच्या जोरावर त्यांनी पाचव्यांदा अध्यक्षपद मिळवले आहे.
देशातील आणि परदेशातील स्थान अधिक भक्कम
पाचव्यांदा अध्यक्ष झालेल्या इर्दोगन यांचे देशात आणि परदेशातील स्थान अधिक भक्कम झाले आहे. विशेषतः युरोप आणि आशिया खंडातील देशांबरोबर तुर्कीयेचे संबंध बिघडले आहेत. “नाटो’मधील प्रमुख देश म्हणून तुर्कीयेने स्थान मिळवले आहे. अशाचवेळी इर्दोगन यांच्या हातात पुन्हा सत्ता एकवटली आहे. तुर्कीयेने “नाटो’मधील स्विडनच्या प्रवेशाला हरकत घेतली आहे. तसेच अमेरिकेचे निर्बंध असतानाही रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा विकत घेतली आहे. तुर्कीयेच्या या निर्णयामुळे अमेरिकेने लढाऊ विमानांच्या प्रकल्पातून तुर्कीयेला बाहेर काढले आहे. मात्र तुर्कीयेने रशिया आणि युक्रेन दरम्यान धान्य वितरणाच्या करारात मोलाची मध्यस्थी देखील केली. यामुळे जगभरातील विशेषतः आफ्रिकेतील अन्न सुरक्षाचे मोठे संकट टळले.