पुणे – उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पूर्व मोसमी पावसाने सोमवारी दिलासा दिला आहे. मात्र, हा पाऊस उपनगरांमध्येच झाला असून शहराच्या उर्वरीत भागात केवळ पावसाचा शिडकावा झाला आहे. या पावसाने औंध तसेच विद्यापीठ परिसरात गारा पडल्या आहेत.
वाकडेवाडी, शिवाजीनगर, विश्रांतवाडी, नगर रस्ता परिसरात काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान घसरले असले तरी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. सोमवारी दुपारी दोन पर्यंत उन्हाचा चटकाही होता. मात्र, दुपारी दोन नंतर शहराच्या पश्चिम तसेच उत्तर भागात आभाळ चांगलेच भरून आले होते.
त्यानंतर पाचच्या सुमारास औंध आणि पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसाच्या सुरूवातीला काही वेळ चांगल्याच गारा बरसल्या त्यानंतर मुसळाधार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास हा पाऊस सुरू होता. त्यानंतर बोपोडी तसेच विश्रांतवाडी, येरवडा, शिवाजीनगर, कळस, नगररस्ता, लोहगाव परिसरातही काही वेळ पाऊस झाला.