Election Result 2023 : विधानसभा निवडणुकांचे निकाल इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीला इशारा देणारे आणि जागे करणारे ठरले आहेत. भाजपचा समर्थपणे मुकाबला करायचा असल्यास एकदिलाने लढावेच लागेल, असा स्पष्ट संदेश निकालांनी दिला आहे.
त्या इशाऱ्याने सावध होत इंडियाही पुन्हा सक्रिय होत असल्याचे सूचित होत आहे. त्या आघाडीने ६ डिसेंबरला दिल्लीत बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडियाची स्थापना केली.
मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे त्या आघाडीचे कामकाज जवळपास ठप्प झाले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे इंडियातील प्रमुख घटक असणाऱ्या कॉंग्रेसने निवडणुकांवर केलेला फोकस.
त्यावरून इंडियाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. निवडणुकांमुळे इंडियाचे कामकाज थांबल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
त्याशिवाय, मध्यप्रदेशातील जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याने इंडियातील आणखी एक महत्वाचा घटक असणाऱ्या समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला थेट लक्ष्य केले. त्यावरून त्या दोन्ही पक्षांत जुंपली. त्यामुळे इंडियात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले.
अर्थात, विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पुढे जात राहिली तसे संपूर्ण देशाचे लक्ष त्या निवडणुकांकडे लागले. त्या निवडणुकांत कॉंग्रेसची चांगली हवा झाल्याने तो पक्ष सुखावला. इंडियातील घटक पक्षांनीही त्यामुळे काहीसे सबुरीने घेतले.
मात्र, विधानसभा निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसला धक्का देणारे आणि इंडियाची चिंता वाढवणारे ठरले आहेत. तसे असले तरी तातडीने सावध होत इंडियाने पुढील राजकीय महासंग्रामाकडे लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
त्या आघाडीची दिल्लीत होणारी बैठक तेच सूचित करते. संबंधित बैठक कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे समजते.