निवडणुकीचा लक्षवेधी टप्पा (अग्रलेख)

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाच्या आणि लक्षवेधी अशा चौथ्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होणार आहे. तसे पाहिले तर गेल्या आठवड्यात पार पडलेला तिसरा टप्पा सर्वांत मोठा होता. आज होणाऱ्या चौथ्या टप्प्यात देशातील एकूण 9 राज्यांमधील 71 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. तरीही या टप्प्यातील मतदान निर्णायक ठरणार आहे. कारण अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात मतदार आपला हक्‍क बजावणार आहेत. या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित सर्व 17 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असल्यानेच देशाच्या आर्थिक राजधानीचा कौल अतिशय महत्त्वाचा मानावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेली विधाने पाहता या टप्प्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुंबईतील जाहीर सभेत कॉंग्रेसला मोठ्या मुश्‍किलीने 50 जागा मिळू शकतील की नाही, अशी शंका व्यक्‍त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये जे मतदान झाले आहे त्यात कॉंग्रेस व मित्र पक्षांना एनडीएपेक्षा मोठी आघाडी मिळाली आहे, असा दावा ज्येष्ठ पी. चिदंबरम यांनी केला आहे.

या तीन टप्प्यांतील मतदानाची संपूर्ण माहिती घेऊन हे विधान करीत असल्याचे सांगत त्यांनी या टप्प्यांमध्ये कॉंग्रेसने मोदींच्या विरोधात बरोबरीची कामगिरी केल्याची खात्री व्यक्‍त केली आहे. देशात आतापर्यंत पार पडलेल्या तीन टप्प्यांमध्ये एकूण 303 मतदार संघांमध्ये मतदान झाले आहे आणि त्यामध्ये चिदंबरम यांनी म्हटल्याप्रमाणे दोनही आघाड्यांनी समान कामगिरी केली असेल तर यापुढचे टप्पे विशेषत: आजचा चौथा टप्पा निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. आजच्या चौथ्या टप्प्यासोबत महाराष्ट्रातील निवडणुकीची धामधूम संपणार आहे आणि तर्कवितर्क सुरू होणार आहेत. देशात उत्तर प्रदेशनंतर लोकसभेत सर्वाधिक लोकप्रतिनिधी पाठवणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य असल्याने या राज्यातील कामगिरीवरही केंद्रातील सत्ता अवलंबून राहणार आहे. गेल्या निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी 42 जागा भाजप आणि शिवसेना यांनी जिंकल्या होत्या.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कामगिरीमुळे केंद्रात सत्ता स्थापन करणे भाजपला सोपे गेले होते.

आज चौथ्या टप्प्यात ज्या जागांवर निवडणूक होत आहे त्या सर्व मतदारसंघांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्‍चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत या 17 जागांपैकी 8 जागा भाजपने तर 9 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. विजयाची ही 100 टक्‍के कामगिरी कायम राखणे भाजप आणि शिवसेना यांना शक्‍य होणार आहे का? हे पाहावे लागेल. कारण एकतर गेल्यावेळी मोदी यांची लाट होती आणि विरोधी पक्षही मरगळलेले होते. आता परिस्थिती बदलली आहे. विशेषत: मुंबईतील कामगिरीत सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. कॉंग्रेस आघाडीने मुंबईतील निवडणूक खूपच गांभीर्याने घेतली आहे आणि उमेदवारही प्रबळ आहे. उत्तर मुंबईत गेल्यावेळी विक्रमी मताधिक्‍क्‍याने निवडून येणारे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे यावेळी कॉंग्रेस उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मोठे आव्हान उभे केले आहे.

आतापर्यंत झालेल्या प्रचाराचा कल पाहता येथे तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबईत कॉंग्रेसचे मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आमनेसामने उभे ठाकल्याने तेथील लढतही लक्षवेधी ठरणार आहे. ईशान्य मुंबईत भाजपने किरीट सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे आहे. उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार पूनम महाजन आणि कॉंग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यातही “कांटे की टक्‍कर’ होण्याची चिन्हे आहेत. नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे समीर भुजबळ आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यातील लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. या सर्व लढती तुल्यबळ आणि लक्षवेधी ठरणार असल्याने देशातील सत्ता समीकरण घडवणारा किंवा बिघडवणारा हा टप्पा ठरेल. केंद्रात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील जागांवर भरवसा आहे. गेल्या वेळी मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती झाली तर भाजपला मोठा विजय मिळेल असे पक्षाला वाटते. पण चिदंबरम यांनी केलेले विधान पाहता या तीनही राज्यांत भाजपची लढाई अवघड बनू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये जाट आणि मुस्लीम या समाजाने भाजपला मतदान केले होते. पण या वेळी त्यांनी सप-बसला पसंती दिली तर भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात. हीच स्थिती बिहारमध्ये पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये गमावलेल्या जागा ईशान्येकडील राज्यांमधून आणि पश्‍चिम बंगालमधून भरून निघतील असे भाजपला वाटत असल्याने त्यांनी तशी रणनीती आखली आहे.

आजच्या चौथ्या टप्प्यात राजस्थानातील 13 जागांवरही निवडणूक होणार आहे. गेल्यावेळी राज्यातील सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या.पण त्यानंतर गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आणि कॉंग्रेसला सत्ता मिळाली. साहजिकच या राज्यात कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास वाढल्याने भाजपला कडवे आव्हान आहे. त्याशिवाय भाजपचा प्रभाव असलेल्या पण आता विरोधी पक्ष सक्रिय झालेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यातही आज मतदान होणार असल्याने तेथील लढती निर्णायक ठरणार आहेत. आजच्या चौथ्या मतदान टप्प्यानंतर देशात जे आणखी टप्पे पार पडणार आहेत त्यात 170 मतदारसंघात मतदान होणार आहे. हे सर्व मतदारसंघही भाजपच्या प्रभावाखालील असले तरी तेथेही विरोधकांचे आव्हान उभे आहे. आजवरच्या मतदानाचा कल आणि कौल पाहून सत्ताधारी भाजप आघाडीला थोडे जास्तच सावध व्हावे लागेल आणि विरोधी पक्षांना अधिक उत्साहाने काम करावे लागेल. अर्थात राजकीय पक्षांची रणनिती काहीही असली तरी सर्वसामान्य मतदारांनी मात्र न विसरता आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायला हवे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.