पाच-सहा महिन्यांपासून इस्त्राईल आणि हमासमधील युद्धाचे परिणाम अनेक देश भोगत आहेत. आता रमजानमास जवळ येत असताना हे युद्ध थांबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचीही मानसिकता आता युद्ध थांबविण्याचीच आहे.
इजिप्त, कतार, अमेरिका, फ्रान्स आणि इतर देशांच्या प्रतिनिधींनी पॅलेस्टिनी प्रदेशातील मानवतावादी संकटाच्या वेळी इस्रायल आणि हमाससाठी मध्यस्थी म्हणून काम केले आहे. यामध्ये गाझा पट्टीतून इस्त्रायली ओलीसांची सुटका आणि युद्ध संपविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. युद्धविराम झाला, तर इस्त्रायली ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात हमास आपल्या अनेक कैद्यांची इस्त्रायली तुरुंगातून सुटका करू शकेल. पॅरिसमध्ये या आठवड्याच्या शेवटी झालेल्या बैठकीत अनेक पक्षांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला; परंतु त्यात हमासच्या प्रतिनिधींचा समावेश नव्हता. पॅरिस बैठकीनंतर इजिप्शियन, कतारी आणि अमेरिकन माध्यमांनुसार, दोहा येथे अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या चर्चेत इस्त्रायल आणि हमासचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यापूर्वी युद्धविराम करणे हे या बैठकीचे ध्येय होते.
नेतान्याहू यांनी गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेण्याचे वर्णन भ्रामक असल्याचे म्हटले असले, तरी दक्षिण गाझामधील रफाहमध्ये युद्धविरामावर कोणताही करार झाला तर केवळ लष्करी हल्ला पुढे ढकलला जाईल. सुमारे 14 लाख दक्षिण गाझामध्ये राहतात आणि सध्या इस्त्रायली सैनिक या भागात हमासचे तळ नष्ट करत आहेत. असे असले, तरी इस्त्रायली अधिकार्याने मात्र सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. लष्करी आणि गुप्तचर कर्मचारी करारावर अतिरिक्त चर्चेसाठी कतारला गेले होते. फ्रेंच अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांनी चर्चेत भाग घेतला. कतारच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, शेख तमीमने हमासचे नेते इस्माईल हनीया यांची दोहामध्ये भेट घेतली आहे. गाझामध्ये त्वरित आणि कायमस्वरूपी युद्धविरामच्या प्रयत्नांवर चर्चा केली आहे.
इस्त्रायलच्या हल्ल्यात 29 हजारांहून अधिक लोक मारले गेल्याचा दावा हमास-नियंत्रित गाझा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. दक्षिण इस्त्रायलवर हल्ल्यानंतर हमासने ओलिस ठेवलेल्या 250 लोकांपैकी 130 ओलिस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत, तर इस्त्रायलनुसार 31 ओलिसांचा मृत्यू झाला आहे. रमजानच्या निमित्ताने या दोन्ही देशांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सशर्त करार जवळपास झाला आहे. ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्त्रायली तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याचा यात समावेश आहे. इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी याच्या उलट विधान केले असून करार होऊनही युद्ध थांबणार नसल्याचे सांगितले आहे. तरीही गाझामध्ये तात्पुरत्या युद्धबंदीच्या आशा वाढल्या आहेत. पॅरिस चर्चेत यावर जवळपास एकमत झाले आहे. आता पुढचा टप्पा कतार आणि इजिप्तमध्ये होणार आहे. रमजानच्या निमित्ताने पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात हमासच्या ओलिसांची सुटका आणि तात्पुरता युद्धविराम होऊ शकतो, असे मानले जाते.
इस्त्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलांट यांचे विधान मात्र विपर्यस्त आहे. जर कोणाला वाटत असेल की आम्ही ओलिसांची सुटका करण्यासाठी करारावर पोहचू आणि त्यानंतर गोष्टी सुलभ होतील, तर ते चुकीचे आहेत. यापुढेही आम्ही हा लढा सुरूच ठेवू. आमचे ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही हे करू. आम्हाला हमासला पूर्णपणे नष्ट करायचे आहे, अशी भाषा त्यांनी वापरली आहे. बायडेन आणि अन्य नेत्यांच्या विपरित ही भाषा असली, तरी पडद्याआडून वेगळेच काही घडते आहे. सर्वत्रिक दबाव असतानाही इस्त्रायलने नेहमीच युद्ध सुरू ठेवण्याची भाषा केली आहे. पॅरिसनंतर कतार आणि इजिप्तमध्ये चर्चेच्या दोन फेर्या होतील. हमास चळवळीचे शिष्टमंडळ, इजिप्त, कतार, अमेरिका आणि इस्त्रायलमधील तज्ज्ञांचा त्यात समावेश असेल. या दोन्ही बैठका दोहा, कतार आणि इजिप्तमधील कैरो येथे होणार आहेत. या वर्षी जानेवारीपासून आत्तापर्यंत युद्धविराम संदर्भात चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या आहेत; परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. पुन्हा एकदा ओलिसांची सुटका आणि युद्धविराम याबाबत चर्चा झाली यातून सकारात्मक अपेक्षाही आहेत. गाझामध्ये हमाससोबत युद्ध पुकारणार्या इस्त्रायल सरकारच्या विरोधात निदर्शने वाढत आहेत.
एकीकडे इस्त्रायली सरकारवर युद्ध संपविण्यासाठी प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आहे, तर दुसरीकडे देशांतर्गत आंदोलने थांबत नाहीत. प्रदीर्घ काळ चाललेले युद्ध आणि वाढत्या खर्चाबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. हजारो लोक पुन्हा एकदा तेल अवीवच्या रस्त्यावर उतरले. ओलिसांच्या सुटकेसाठी हमासशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनियंत्रित आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आंदोलक पोस्टर आणि बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले आणि सरकारच्या राजीनाम्याची मागणीही केली. या अतिरेकी सरकारला आपण कंटाळलो आहोत. आम्हाला हे त्वरित बदलायचे आहे. या सरकारने हमासशी बोलणी करून आमच्या लोकांची सुटका केली पाहिजे; पण नेतान्याहू सरकार देशाच्या समस्या हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका होत आहे.
गाझामध्ये सुरू असलेल्या लढाईमुळे शेजारील देश इजिप्त गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. गाझावरील इस्त्रायलचा हल्ला आणि लाल समुद्रातील वाढता तणाव यामुळे आधीच अडचणींचा सामना करत असलेली इजिप्तची अर्थव्यवस्था बिकट स्थितीत पोहोचली आहे. इजिप्शियन अर्थव्यवस्था सध्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 90 टक्क्यांपर्यंत वाढणारे सार्वजनिक कर्ज आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेले चलन यांच्याशी संघर्ष करत आहे. गाझामधील युद्धामुळे ही आव्हाने अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
गाझामध्ये सुरू असलेले युद्ध आता इजिप्तच्या सीमेजवळ असलेल्या रफाहपर्यंत पोचले आहे. चार महिन्यांच्या इस्त्रायली हल्ल्यांमुळे गाझामधील बहुतांश लोकसंख्या आधीच विस्थापित होऊन रफाह येथे आली आहे. आता इस्त्रायलने रफाहवर केलेल्या हल्ल्यांमुळे गाझातील परिस्थिती भयावह तर होईलच; पण इजिप्तवरही त्याचा परिणाम होईल. पर्यटन आणि सुएझ कालवा हे इजिप्तचे परकीय चलनाचे दोन प्रमुख स्त्रोत आहेत. इजिप्तचे पिरॅमिड, संग्रहालये, रिसॉर्टस् आणि स्मारके जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. या सर्वांमुळे पर्यटन हा दीर्घकाळ राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत बनला आहे. 2022 मध्ये सुमारे 3 दशलक्ष इजिप्शियन लोकांना पर्यटन उद्योगात रोजगार मिळाला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्त्रायलने गाझावर हल्ला सुरू केला, तेव्हा इजिप्तचे पर्यटन हे कोरोना महामारीतून पूर्णपणे सावरलेले नव्हते. यानंतर, हौतींनी लाल समुद्रात इस्त्रायलच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. इजिप्तच्या सीमेवर होत असलेल्या घटनांमुळे पर्यटनास फटका बसला आहे. इजिप्तच्या पर्यटन महसूलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10-30 टक्क्यांनी घट होऊ शकते. त्यामुळे देशाचा परकीय चलन साठा 4-11 टक्के कमी होईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून, इजिप्शियन लाल समुद्रात इस्त्रायलच्या व्यवसायिक जहाजांवर हुथीचे हल्ले सुरू झाले आहेत. सुएझ कालव्याद्वारे आशिया ते युरोपला जोडणार्या सर्वात लहान व्यापार मार्गावरील या हल्ल्यांमुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी केप ऑफ गुड होपच्या आसपास त्यांची जहाजे पाठविली आहेत. याचा थेट परिणाम इजिप्तला मिळणार्या महसुलावर होत आहे.
सुएझ कालव्यामुळे 2022-23 मध्ये इजिप्तसाठी 9.4 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला. या वर्षी जानेवारीमध्ये सुएझ कालव्याच्या महसुलात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. इस्त्रायल-हमास युद्धानंतर इजिप्तच्या वायू अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. इस्त्रायली संरक्षण आस्थापनाने 9 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलच्या दक्षिणेकडील किनारपट्टी शहर अशदोदपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तामार या क्षेत्रातून वायू काढणे तात्पुरते थांबविले आहे. या सर्वांशिवाय रफाहमध्ये आश्रय घेणारे 1.4 दशलक्ष पॅलेस्टिनी नागरिक देखील इजिप्तसाठी अस्वस्थतेचे कारण बनत आहेत.
इजिप्तमध्ये आधीच नऊ लाख निर्वासित आहेत. अशा स्थितीत पॅलेस्टिनींना विस्थापित करण्याचा इस्त्रायलचा हेतूही चिंतेत भर टाकणारा आहे. गेल्या वर्षी सुदानमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून साडेचार लाख सुदानी निर्वासित इजिप्तच्या दक्षिण सीमेवर आले आहेत. यामुळे इजिप्तच्या अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेवरही ताण आला आहे.सबब युद्ध थांबविणे हे केवळ हमासच्या हिताचे नसून या भागातील अनेक देशांना युद्धबंदी हवी आहे.