गोष्टी ऐकायला वाचायला सगळ्यांनाच आवडतात आणि त्यात आपल्या आई-बाबांनी लहानपणी काय केले, त्यांच्या गमतीजमती ऐकताना तर जास्तच मजा येते. मग जर तुम्हाला तुमच्या आजी-आजोबा किंवा त्यांच्या आजी-आजोबांच्याही आधीच्या लोकांच्या गोष्टी वाचायला मिळाल्या तर? धमाल येईल ना? असा विचार करून पाहा, साडेतीन-चार लाख वर्षांपूर्वीच्या आजी-आजोबांच्या गोष्टी किती वेगळ्या असतील नाही? आपल्या सगळ्यांचे खापर खापर… पणजी-पणजोबा म्हणजेच आदिमानव, यांच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
निडरथल, होमो इरेक्टस, होमो नलेदी, होमो सेपिअन ही नावे जी अभ्यासक्रमामधून, पुस्तकांमुळे कानावर गेली असतील. हे आहेत आदिमानव, आपल्या सगळ्यांचे खापर खापर… पणजी-पणजोबा. आदिमानवापासून आताच्या आधुनिक माणसापर्यंतचा प्रवास खूपच उत्कंठावर्धक आहे. एकीकडे आपण आपलेच म्हणजेच मानवाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करतो. पण त्याचबरोबर नवनवीन विविध शोधांपर्यंत कसे काय पोहोचलो, हे शोध कसे काय लागले ज्यामुळे आपले जगणे जास्तीत जास्त सुकर, सोपे होत चालले आहे याचे नवल वाटत राहते. पण हे तर खरं, अचानक ही विविध संशोधने, या सगळ्या सुविधा आपल्या समोर आल्या नाहीत. एकेक पाऊल पुढे टाकत आपण आताच्या या मुक्कामाला पोहोचलो आहोत. या शोधांची सुरुवात कुठे झाली असे वाटते? एकदम बरोबर! याची सुरुवात झाली आहे आदिमानवाच्या काळापासून.
दगडाचा हत्यार म्हणून वापर करायला, आग निर्माण करायला, शेती करायला एवढेच नव्हे बोलायलाही सुरुवात आदिमानावाच्या काळात झाली. पण मग हे सगळे कसे आदिमानव शिकला असेल, हा प्रश्न तर राहतो. खरं तर गेल्या शंभर-दोनशे वर्षांत शास्त्रज्ञांनी अशा या विविध प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. हीच उत्तरे गोष्टीरूपात मोठ्या कल्पकतेने रंगवलेली आहेत विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी. या गोष्टी वाचायला मिळतील “आणि आदिमानव माणूस बनला…’ या पुस्तकामधून. साधी, सोपी पण आकर्षक लेखनशैली आणि समर्पक चित्रे, या सगळ्यांमुळे पुस्तक आकर्षक झाले आहे.
हूं, ओह, फुर्रर्र, अहो, हम्म, भृम हे आहेत निरंजन घाटे यांच्या कल्पनेतून उभे राहिलेले गोष्टींमधील काही नायक. आता अशी का नावे असतील हा प्रश्न पडला असेल ना? पुस्तकाची प्रस्तावना वाचताना या प्रश्नाचे उत्तर निश्चित मिळेल. अशा अनोख्या नावाच्या आदिमानवांच्या गोष्टी वाचताना मजा येते. या विविध गोष्टींमधून आदिमानवाने दगडाचा हत्यार म्हणून वापर करायला, आग निर्माण करायला, शेती करायला, प्राणी पाळायला कशी सुरुवात झाली असेल हे नजरेसमोर उभे राहते.
“आणि आदिमानव माणूस बनला…’ हे पुस्तक म्हणजे अनोखी नावे असणाऱ्या आदिमानवाची रंजक कहाणी. ही कहाणी आहे विविध शोधांच्या प्रवासाची. ही कहाणी आहे आदिमानवाचा माणसापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाची. ही कहाणी आहे उत्क्रांतीची.
समकालीन प्रकाशनाने आणलेले हे पुस्तक फक्त लहान मुलांनाच नाहीतर मोठ्यांनाही वाचनात खिळवून ठेवणारे आहे, हे निश्चित.