आक्रमक अण्वस्त्रांवर कायमची बंदी घालण्यावर एकमत
कॅम्प डेव्हिड, मेरीलॅंड, ता. 21 – आक्रमक अण्वस्त्रांवर कायमची बंदी घालण्याचा करार करण्यावर अध्यक्ष रिचर्ड निक्सन व सोव्हियत कम्युनिस्ट नेते लिओनिड ब्रेझनेव्ह यांचे एकमत झाल्याची माहिती अधिकारी वर्गाच्या गोटातून समजली. अण्वस्त्रशक्तीचा उपयोग शांततेसाठी करण्यासाठी ते दोघेजण सहकार्य करण्याचे मान्य करतील, असेही सांगण्यात
आले आहे.
मेजवानीप्रसंगी इंदिराजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न
टोरोंटो – पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर मेजवानीप्रसंगी हल्ला करण्याचा प्रयत्न येथील एका रहिवाशाने केला. पण तो संरक्षक पोलिसांच्या सावधानतेमुळे फसला. त्या इसमावर झडप घालून पोलिसांनी त्याला पकडले.
येत्या पाच वर्षांत 6 अब्ज रु. पाटबंधारे योजना
औरंगाबाद – येत्या पाच वर्षांच्या कालावधीत 600 कोटी रुपये खर्चाच्या मोठ्या आणि मध्यमप्रतीच्या पाटबंधारे योजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पाटबंधारे व वीजमंत्री वसंतरावदादा पाटील यांनी वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथे योजनेचे उद्घाटन करताना केली.
इस्रायल अरबांविरुद्ध अमेरिकन शस्त्रे वापरणार नाही पण-
कैरो – पश्चिम आशियात रशियाने शस्त्र स्पर्धा थांबविण्याचे मान्य केले तर अमेरिका अशी हमी देईल की, अमेरिकेची शस्त्रास्त्रे इस्रायल अरब राष्ट्रांविरुद्ध उपयोगात आणणार नाही, असे येथील अलअहराम पत्राने जाहीर केले आहे. रशिया व अमेरिका यांच्या शिखर वाटाघाटीत किती प्रगती झाली त्याबाबत या पत्रात म्हटले आहे.