खासगी कामासाठी मंत्र्यांना भेटू नका
पुणे, दि. 3 – येथून पुढे कोणत्याही कॉंग्रेस पुढाऱ्याने खासगी कामासाठी मंत्र्यांना जाऊन भेटू नये, असा आदेश अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने दिला आहे.
म्हैसूर विद्यापीठाचा क्रांतिकारी निर्णय
म्हैसूर – ज्या व्यक्तींनी पन्नाशी ओलांडली आहे त्यांना विद्यापीठातील सर्वोच्च परीक्षेस बसता येईल. या व्यक्तींनी पूर्वी कोणतीच परीक्षा दिलेली नसली तरी चालेल, असा क्रांतिकारी निर्णय म्हैसूर विद्यापीठाने आज घेतला. “मुक्त विद्यापीठ’ मार्गातील हे पहिले पाऊल आहे.
गैरप्रकार केल्यास 5 वर्षे परीक्षेस बसण्यास मनाई
नवी दिल्ली – उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या वेळी फसवणुकीचे प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा निर्णय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. असे फसवणुकीचे प्रकार केल्यास त्यास देशाच्या कोठल्याही भागात 5 वर्षे सदर परीक्षेस बसण्यास बंदी करण्यात येईल.
अरब-इस्रायल युद्ध जवळ आले
बेरुत – अरब-इस्रायल युद्ध जवळ आले असून आता ज्यू राष्ट्राशी तडजोड होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत, असे सीरियाचे अध्यक्ष हफिस असद म्हणाले.