नोंद : घसरण थांबणार कधी व कशी?

– शेखर कानेटकर

पुद्दुचेरी या अवघ्या 33 जागांच्या विधानसभेतील कॉंग्रेस सरकार अल्पमतात आले आणि विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी अवघे तीन दिवस पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे दक्षिणेतून कॉंग्रेस सत्तेच्या दृष्टीने हद्दपार झाली.

2014 पासून देशातील सर्वात जुना व एकेकाळी निर्विवाद प्रभुत्व असलेला कॉंग्रेस हा पक्ष एक एक राज्य गमावत चालला आहे. तरीही पक्षाची ही घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट बुडत्याचा पाय खोलात अशीच स्थिती पाहावयास मिळते आहे. पक्षाची ही दयनीय अवस्था थोडीफार तरी सुधारण्यासाठी काही प्रयत्नही होताना दिसत नाहीत. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक ही राज्ये कॉंग्रेसची एकेकाळी बलस्थाने होती. त्या राज्यांतील प्रभाव कॉंग्रेसने केव्हाच गमावला आहे. तामिळनाडूत अनेक वर्षे द्रमुक-अद्रमुक हे दोन स्थानिक पक्ष आलटून पालटून सत्तेत आहेत. त्यामुळे टीचभर पुद्दुचेरी हाच काय तो कॉंग्रेसला आधार होता. तोही आता तुटला आहे.

सर्व शक्‍तिमान भाजपने ईडी, इन्कमटॅक्‍स आणि इतर यंत्रणांचा वापर करून आमदार फोडले, असा गुळगुळीत झालेला आरोप कॉंग्रेसचे नेते करीत असले तरी आपले नेतृत्व आपले आमदार रोखू का शकत नाहीत, या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर कॉंग्रेसकडून दिले जात नाही. राहुल गांधी यांच्या पुद्दुचेरी दौऱ्याआधी एकच दिवस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला यावरून राहुल गांधी यांचा पक्षावर किती वचक आहे, हे लक्षात येते.

सध्या पंजाब व राजस्थान या दोनच राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारात कॉंग्रेस आहे एवढेच. मध्य प्रदेशात मिळालेली सत्ता पक्षाने नाकर्तेपणाने घालवलीच. राजस्थानातील गळती तूर्त थांबली आहे. पण पंजाब व राजस्थानमधील सत्तेचे श्रेय प्रामुख्याने स्थानिक नेतृत्वाचे (अमरिंदर सिंह/गेहलोत) आहे. महाराष्ट्रात आमच्यामुळेच महाविकास आघाडी सरकार आहे, अशी प्रौढी काही कॉंग्रेस नेते मारत आहेत. त्यांची ही भाषा चालूच राहिली तर येथील एक तृतियांश सत्ताही पक्ष गमावल्याशिवाय राहणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची आजवरची पीछेहाट :

वर्षे आणि कंसात विजयी झालेल्या जागा- 1952 (364), 1957 (371), 1962 (361), 1967 (283), 1971 (362), 1977 (154), 1980 (353), 1984 (415), 1989 (197), 1991 (244), 1996 (140), 1998 (141), 1999 (114), 2004 (145), 2009 (206), 2014 (44), 2019 (52).

लोकसभेच्या आजवर 17 निवडणुका झाल्या. त्यातील 7 निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले. स्वातंत्र्यानंतर केंद्रात सत्तेवर आलेल्या 10 सरकारांचे नेतृत्व कॉंग्रेसने केले. 6 निवडणुकांमध्ये तीनशेपेक्षा जास्त जागी विजय मिळविला. दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत (1957 साली) पक्षाने सर्वोच्च 371 जागा जिंकल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये हा आकडा 415 वर पोहोचला होता. पण 57 वर्षांनी पक्षाचे संख्याबळ 52 वर आले आहे. 2014 मध्ये तर 44 चा नीचांक झाला.

देशाला आजवर 14 पंतप्रधान लाभले. त्यातील सहा कॉंग्रेसजन होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी हे तिघे नेहरू-गांधी घराण्यातील तर लाल बहाद्दूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंहराव व डॉ. मनमोहनसिंग हे नेहरू-गांधी परिवाराबाहेरील. शास्त्रीजींचा अकाली मृत्यू झाला पण राव व सिंग यांनी अनुक्रमे एक व दोन टर्म पूर्ण केल्या. उत्तमपणे सरकार चालविले. घराण्याबाहेरील व्यक्‍तीला संधी मिळाली तर ते उत्तम कामगिरी करू शकतात, हेच या दोघांनी जणू सिद्ध केले. परंतु कॉंग्रेस पक्ष अजून गांधी घराण्यालाच का कवटाळत आहे, हे समजत नाही.

2019 निवडणुकीत कॉंग्रेसला 20 राज्यांत एकही जागा मिळालेली नाही. पक्षातील प्रामुख्याने आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. पाणी डोक्‍यावरून केव्हाच वाहू लागले आहे. पक्षाला नवा, तरुण, धडाकेबाज अध्यक्ष देण्याची चालढकलच चालू आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वळचणीला गेले. सचिन पायलट नाराज आहेतच. त्यांचे बंड तूर्त शमले आहे. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांची नाराजी त्यांच्या जाहीर वक्‍त्यव्यावरून दिसते आहे. अशा स्थितीत पक्षाची घसरण कोण, कशी व कधी थांबवणार, हा प्रश्‍नच आहे. प्रत्येक निवडणुकीआधी भाजप पूर्ण ताकदीनिशी तयारी करीत आहे (उदा. पश्‍चिम बंगाल) पण कॉंग्रेस आघाडीवर सारे काही आलबेल असल्यासारखी स्थिती नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.