चर्चेत : वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा!

-तुषार सावरकर

राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इव्हेंट होण्याऐवजी तर्कसंगत, बुद्धिवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. काल 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला त्यानिमित्ताने घेतलेला विविधांगी आढावा…

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व तत्कालीन विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी भारतात विज्ञान, वैज्ञानिक शोध व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी “विज्ञान दिवस’ पाळण्याचे ठरविले. त्यानुसार भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांनी त्यांचा पारदर्शी पदार्थमधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा शोध प्रकाशित करण्यासाठी ज्या दिवशी पाठविला तो दिवस विज्ञान दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले.

डॉ. सी. व्ही. रामन यांच्या देदीप्यमान कार्याबद्दल तसेच भारतात वैज्ञानिक विचारांच्या प्रसारासाठी त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ 1986 पासून “राष्ट्रीय विज्ञान दिन’ पाळला जात आहे. परंतु त्यामागील उद्देश समजून न घेता एक दिवस उत्सवाचे व सणाचं स्वरूप आलं म्हणजे आपलं कार्य संपन्न केल्याचं समाधान सरकारला मिळतं. जनतेने 2-4 पोस्ट शेयर केल्या म्हणजे जनतेने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला असा समज करून सर्व आपापल्या उद्योगाला लागतात. पण आपल्यात खरोखरच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला आहे का? की आपण आणखीच मागास व बुरसट होत चाललो आहोत याचा विचार करण्याची गरज कोणालाच वाटत नाही. समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विकास झाला की आपोआपच समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा मिळतो. समाज अज्ञान व अंधश्रद्धेच्या सापळ्यातून याच विज्ञानामुळे बाहेर निघू शकतो.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वैयक्‍तिक व सामाजिक आयुष्यात कपोलकल्पित भ्रम ऐवजी विज्ञाननिष्ठ व तर्कसंगत व्यवहार अंगीकारणे होय. तसेच सामाजिक जीवनात असा विचार प्रसारित करण्यासाठी सहकार्य करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान दृष्टिकोन म्हणजे एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन विश्‍लेषण करणे व ते प्रसारित होईल यासाठी प्रयत्नरत राहणे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. विशेषतः भारतासारख्या देशात तत्वज्ञान व धार्मिक विचारांच्या अतिरेकामुळे सम्यक विचार अंगीकारण्यात व रुजविण्यात अनन्य अडचणी येतात. परंतु अशा अडचणींवर मात केल्यावर समाज समानता, समता, समरसता, न्याय, बंधुता अशा मानवी मूल्यांवर उभा राहतो. त्यातूनच सर्वांना समान संधी मिळण्यास मदत होते.

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी शिक्षण हे मूलभूत घटक आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करणे हे शिक्षणाचं महत्त्वाचे तत्त्व आहे. परंतु आपली शिक्षण पद्धती तसं करण्यात सक्षम आहे का? पूर्व प्राथमिक, औपचारिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, उच्च शिक्षण यातून खरंच तसं होतं का? याचं उत्तर बहुदा नाही असंच द्यावं लागेल. ते तसं न होण्याची कारणं पण आपल्यापाशी येऊन थांबतात. आपल्या देशात साक्षरता व शिक्षणाचं प्रमाण वाढलं असलं तरी त्या मानाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही.

आपल्या समाजात ज्या अंधश्रद्धांचं अवडंबर माजलं आहे त्यात अशिक्षित इतकेच सुशिक्षितही सहभागी आहेत. किंबहुना दिवसेंदिवस त्यांची संख्या कमालीची वाढत चालली आहे. त्यामुळे शिक्षणाचा आणि विवेकशीलतेचा काही संबंध आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणे अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रात सक्रिय असणारे व अधिकार पदावर असणारे बहुतांश धर्माळू असल्याने अनेकदा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे सम्यक दृष्टीने पाहण्याऐवजी ते पारंपरिक दृष्टीने पाहतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये चौकस व तर्कबुद्धी वृद्धिंगत करण्यात यशस्वी होत नाहीत. त्यांच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन फक्‍त शोधांची माहिती व त्यावर निबंध लिखानासारखे उपक्रम राबविणे इतपत आहे.

सरकारने व समाजातील प्रतिष्ठित व्यक्‍तींनी वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारित करणं आवश्‍यक आहे. परंतु ते करण्याऐवजी काही चुकीच्या गोष्टी प्रसारित करण्यात येत आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यक्‍तींकडून वारंवार असं सांगितलं जातं की, आधुनिक वैद्यकशास्त्र, स्टेम सेल, जनुकीय अभियांत्रिकी, अणू विज्ञान, प्लॅस्टिक सर्जरी, क्‍लोनिंग, इंटरनेट, प्रक्षेपण शास्त्र इत्यादींची बीजे भारतातील प्राचीन ग्रंथात असल्याचं सांगितलं जातं. परंतु त्याबाबत ना पुरावा दिला जातो ना त्यावर कोणतेही संशोधन केलं जातं. समाजातील प्रतिष्ठित व्यक्‍तींकडून जर तर्कहीन गोष्टी पेरल्या गेल्या तर स्वाभाविकच त्याचा फार मोठा परिणाम समाजावर होतो.

करोना सारख्या काळात आपल्यातील अनेकांना समाजमाध्यामांवर कोविड 19 सारख्या व्हायरसवर प्राचीन काळी उपचार उपलब्ध होता, असे भासवण्यात आले. त्यामुळे अनेकांनी आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथीच्या नावावर बरीच औषधे विकून मोकळे झालेत. परंतु त्याचे ना दस्तऐवजीकरण झाले ना त्यावर संशोधन झाले. जसं भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केले आहे. तसेच “वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार’ करण्याचे कर्तव्य पण आहे. विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारित होण्यात जसं नागरिक अपयशी आहेत तसेच सरकार पण तसं वातावरण निर्माण करण्यात अयशस्वी ठरले आहे.

समाजात विवेकशीलपणा वृद्धिंगत करणे, समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नियमबद्ध उपक्रमांची आवश्‍यकता असते. आपल्याकडील सरकार, शासन व शैक्षणिक संस्था असे उपक्रम राबविण्यात पूर्णतः यशस्वी झालेले नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.