कोरियन राजकीय परिषद दिल्लीत भरणार?
पान मून जॉन, ता. 30 – संकल्पित कोरियन राजकीय परिषद भारताची राजधानी दिल्ली येथे भरवावी अशी सूचना कम्युनिस्टांनी केली असून यूनो गटाकडून त्यास विरोध होणार नाही असे दिसते आहे. ही परिषद भारतात अगर पाकमध्ये भरविण्यास यूनो गट तयार होईल; परंतु ब्रह्मदेश अगर इंडोनेशियात परिषद भरविण्यास मात्र यूनो संमती देणार नाही, असे यूनो गटातून समजते. राजकीय परिषदेबाबतच्या प्राथमिक स्वरूपाच्या चर्चेत आज कम्युनिस्टांतर्फे वरील सूचना केली.
कम्युनिस्टांच्या सूचना…
ही परिषद 28 डिसेंबरला सुरू व्हावी आणि रशिया, भारत, इंडोनेशिया, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान ह्या पाच राष्ट्रांस तटस्थ राष्ट्रे म्हणून परिषदेत भाग घेण्यास आमंत्रण द्यावे. तसेच मायदेशी जाण्यास तयार नसणाऱ्या युद्धबंद्यांचे भवितव्य हा विषयही परिषदेच्या कार्यक्रमपत्रिकेवर असावा. सर्व परराष्ट्रीय सैन्य कोरियातून काढून घेण्यात घ्यावे ह्या विषयाचाही कार्यक्रमपत्रिकेत अंतर्भाव करावा. तटस्थ राष्ट्रांना मतदानाचा हक्क असणार नाही, असे कम्युनिस्टांच्या सूचनेत आहे.
हॉटेलातील रेडिओ बंद होणार
पुणें, ता. 30 – पुण्यातील हॉटेलांतून ता. 1 जानेवारीपासून रेडिओ न ठेवण्याचा निर्णय पुणें हॉटेल मालक संघातर्फे आज रात्री भरलेल्या हॉटेल मालकांच्या सभेत घेण्यात आला. पुण्यामध्ये सुमारे 1600 हॉटेल्स आहेत आणि त्यापैकी सुमारे 1200 हॉटेल्समध्ये रेडिओ आहे. हॉटेलमध्ये रेडिओ ठेवण्याचा खर्च प्रत्येक हॉटेलला वर्षाला सुमारे 125 रुपये येतो. हॉटेलधंदा आता वाढत्या कराच्या बोजामुळे नुकसानीत चालला असून अवास्तव खर्च कमी करणे आवश्यक झाले आहे आणि हे जाणूनच पहिली पायरी म्हणून रेडिओ बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या सभेस सुमारे 200 हॉटेलमालक उपस्थित होते; आणि हा निर्णय एकमताने घेण्यात आला. आज उपस्थित नसलेल्या रेडिओ ठेवणाऱ्या हॉटेल मालकांस भेटून त्यांनाही ह्या निर्णयानुसार आपले रेडिओ बंद ठेवण्यास सांगण्यात येणार आहे. हॉटेल मालकांवर सध्या कॉर्पोरेशन व सरकारचे मिळून दिवसेंदिवस जे वाढते कर लादण्यात येत आहेत त्यासंबंधी प्रसंगी विश्रामबाग वाड्यासमोर काही प्रमुख हॉटेल मालक उपोषण करणार आहेत अशी दाट वदंता आहे.