नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची चौकशी केलेल्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अनिवासी भारतीय उद्योगपती सी. सी. थांपी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात वादग्रस्त शस्त्र विक्रेता संजय भंडारी याचीही चौकशी करण्यात आली होती.
वड्रा यांनी विदेशात बेकायदा मालमत्ता भंडारीकडून घेतल्याच्या आरोपाची इडीकडून चौकशी सुरू आहे. थांपी यांची दुबईतील कंपनी स्काय लाईटकडून भंडारीची कंपनी सॅनटेक एफझेडई यांनी एक मालमत्ता खरेदी केली होती. नंतर ती वड्रा यांच्या नावावर केल्याचा आरोप आहे.
थांपी हा या प्रकरणातील महत्वाचा दुवा आहे, असा दावा इडीने यापुर्वी केला होता. इडीने थांपी आणि वड्रा यांची भेट सोनिया गांधी यांच्या मार्फत झाली असल्याचा दावा केला आहे तर अमिरात एअरलाईन्सच्या विमानात ओळखझाल्याचे वड्रा यांनी इडीला सांगितले आहे.
या सदनिकेच्या आधुनिकीकरणासंर्भात वड्रा आणि थांपी यांच्यात काही इमेल्स झाले होते. त्यामुळे थांपी यांच्या चौकशीत या प्रकरणातील निखळलेले दुवे मिळू शकतात, असे इडीचे म्हणणे आहे.
इडीकडून थांपीला एक हजार कोटी रुपयांच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. केरळमध्ये केलेल्या जमीन खरेदीच्या प्रकरणातही 2017 मध्ये इडीने थाम्पी यांना नोटीस बजावली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलिडे सिटी सेंटर प्रा. लि., हॉलिडे प्रॉपर्टी प्रा, लि. आणि हॉलिडे बेकल रिसॉर्ट प्रा. लि. या थांपीच्या कंपन्या इडीच्या स्कॅनरखाली आहेत. थांपीचे राजकीय पक्षांशी असणारे संबंधही तपास यंत्रणा पडताळून बघत आहेत.
वड्रा यांच्या विरोधातील चौकशीच्या संदर्भात, इडीने इंग्लंडमधील मालमत्तांचा तपशील मागवला होता. सुमारे अर्धाडझन मालमत्तांच्या खरेदीच्या व्यवहारांचा तपशीलही मागवला होता. मात्र बदल्याच्या भावनेने ही कारावाई केली जात असून अनावश्यक नाटक केले जात असल्याचा दावा वड्रा यांनी केला होता.