‘त्या’ शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने मिळाला दिलासा

जमिनीच्या फेरफार नोंदी झाल्या अद्ययावत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर मोठ्या व्यग्र दैनंदिनीत एका शेतकऱ्याच्या व्यथेची दखल घेतली होती.  व्यथित होऊन जीवन संपविण्याच्या तयारीने मुंबईत दाखल झालेले नांदेड जिल्ह्यातील धनाजी जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांमुळे नवी उमेद घेऊन परतले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आत्मीयतेने दखल घेतलेल्या या शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. जमिनीच्या सातबारावर नोंदी अद्ययावत झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जमिनीवरील कर्ज नोंदीमुळे फेरफार न झाल्याने धनाजी जाधव यांचा मोठा व्यवहार अडला होता. त्यावर त्यांनी मुंबईत येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना भेटण्याची संधी मिळाली. धनाजी जाधव यांनी आपल्या जमिनीचा व्यवहार आणि कर्ज याबाबत माहिती दिली. त्याही व्यग्रतेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशीलतेने परिस्थिती जाणून घेतली. धनाजी जाधव यांना निराश होऊ नये, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वस्त केले. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणा आणि महसूल अधिकारी यांना निर्देश दिले.

त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसूल यंत्रणेसह, धनाजी जाधव व संबंधित बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधला. जाधव यांच्या प्रकरणातील वस्तुनिष्ठता तपासून जमीन विक्री प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे निर्देश दिले. या फेरफारीमुळे जाधव यांना यापुढे कर्ज फेडीसह शेतीविषयक कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे एका शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here