नवी दिल्ली – सध्या देशात करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन 4.0 मध्ये सरकारने अनेक प्रकारची शिथिलता दिलेली आहे. भारत सरकारने एक नवीन वेबसाइट तयार केलेली आहे, तिथे देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी कोविड ई-परमिटसाठी अर्ज करता येईल. www.serviceonline.gov.in/epass या वेबपेजला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी)ने तयार केले आहे. सध्या या वेबसाइटवर 17 राज्यांमध्ये ई-परमिटसाठी अर्ज करता येणार आहे.
प्रवासासाठी लॉकडाऊन परमिट पासला प्रवासाच्या काही ठराविक वर्गानुसारच ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. या वर्गामध्ये विद्यार्थी, अत्यावश्यक सेवा, पर्यटक, तीर्थयात्रा, वैद्यकीय आणि लग्न यांचा समावेश आहे. वेबपेजवर दिलेल्या माहितीनुसार कोणीही वैयक्तिक किंवा समूह या सेवेचा उपयोग करून ई-पाससाठी अर्ज करू शकतात. ज्या व्यक्ती या सेवेमार्फत अर्ज करू इच्छितात त्यांनी आवश्यक ती माहिती देणे अनिवार्य आहे.
त्यांना ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन प्रत जमा करणे आवश्यक आहे. याशिवाय ओटीपी पडताळणीसाठी मोबाइल क्रमांक देणेही आवश्यक आहे. वेबपेजवर एक वेळा ऍप्लिकेशन भरल्यानंतर अर्जदारांना एक रेफरन्स क्रमांक दिला जातो, ज्यामुळे अर्जदाराला अर्ज ट्रॅक करता येऊ शकतो. जेव्हा अर्जदाराला ई-पास दिला जातो तेव्हा त्यावर अर्जदाराचे नाव, पत्ता, वैधता आणि क्यूआर कोड दिलेला असतो.