एसटी स्थानकातही गर्दी : परवानगीची प्रतीक्षा
पुणे – लॉकडाउनमुळे शहरात अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना गावी जाण्यासाठी परवानगी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. अनेक जण परवानगी मिळेल या हेतूने रेल्वे स्थानक आणि एसटी स्टॅंडच्या आवारामध्ये गर्दी करत आहेत. मंगळवारी अशीच गर्दी पुणे स्टेशन एसटी स्थानकात होती.
लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. यामुळे परराज्यांतील कामगार, मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. याद्वारे विविध शहरांतून स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने स्थलांतरित नागरिकांना मूळ गावी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील अडकलेले बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड आदी राज्यांतील मूळ गावी जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मात्र, घरी जाण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करतात, हे माहिती नसल्याने काही नागरिक रेल्वे स्टेशन, एसटी स्थानकामध्ये येत आहेत.
या परिसरामध्ये शारीरिक अंतराच्या नियमांचे देखील उल्लंघन होत आहे. घरी जाण्यासाठी पास मिळत नाही, प्रशासनाकडे नोंदणी झाली नसल्याने, अनेक जण त्यांच्या परिवारासह स्थानकाच्या परिसरातच मुक्काम ठोकल्याचे चित्र आहे.