नगर – महानगरपालिका प्रशासनातर्फे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीतील माहिती असल्याचे सागूंन त्यासंदर्भात मेसेज व्हायरल करणे शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलटी आले. लोकांमध्ये खोटा मजकूर पसरवून शहरात भीती निर्माण केल्याच्या आरोपावरुन जागरुक नागरीक फोरमचे पदाधिकारी सुहास मुळे यांच्याविरूद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (ता.13) दुपारी महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी महापालिका पदाधिकारी, आमदार, पोलिस अधिकारी आणि महापालिकेचे अन्य अधिकारी यांच्यासमवेत करोना प्रतिबंधक उपायोजनांसाठी एक आढावा बैठक घेतली. त्या बैठकीचा हवाला देऊन मुळे यांनी सोशल मीडियातील काही गृपवर एक मेसेज पाठविला होता.
त्या बैठकीस आपण उपस्थित होतो, असे सांगत येत्या 16 जुलैपासून शहरात लॉकडाउनचा निर्णय होणार असल्याने नागरिकांनी आधीच खरेदी करून ठेवावी, असे त्यांनी म्हटले होते. शिवाय बैठकीत आपण जे ऐकले त्यावरून नगर शहरातील करोनाची परिस्थिती कल्पनेपेक्षा भयानक असल्याचाही उल्लेख त्यांनी केला होता.
काही वेळातच मुळे यांचा हा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला. याप्रकरणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सायबर पोलिस आणि प्रशासनाने हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्टीकरण दिले. तथापि, तोपर्यंत शहरात अफवा आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुळे यांच्याविरूद्ध कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला.
लॉकडाउनसंबंधी कोणताही निर्णय झालेला नसताना मुळे यांनी हा मेसेज पाठवून अफवा पसरविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे. दरम्यान, यापुढे कोणत्याही स्वरुपाचे भीतीदायक मेसेज कोणीही पाठवू नयेत. करोनासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. त्यामुळे विनाकारण नागरीकांचे गैरसमज होतील, अशी भूमिका कोणीही घेऊ नये, अशी तंबीही देण्यात आली आहे. असे कृत्य करणारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबीही प्रशासनाने दिली आहे.
फॉरवर्डला चपराक…!
अलिकडे सोशल मीडियाद्वारे कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याचे फॅड वाढले आहे. आपल्या मोबाईल नंबरवर आलेला मेसेज खरा की खोटा, याची शहानिशा न करताच नागरीक तो फॉरवर्ड करत आहेत. त्यातून नव्या अडचणी निर्माण होत आहेत. अत्यंत हलगर्जीपणे हे काम सुरु आहे. मात्र, असे गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाल्याने कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांना ही चपराक असल्याचे मानले जाते.