एक रुपया मानधनात सल्लागार नियुक्त : “स्थायी’च्या सभेत ऐनवेळी मंजुरी
पिंपरी – शहरात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका तसेच, खासगी रुग्णालयांत करोनाबधित रूग्णांना बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे पालिकेने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयच्या मैदानात करोनाचे तात्पुरते रूग्णालय (कोविड केअर सेंटर) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे रुग्णालय मगर स्टेडियममधील मैदानातील 5.15 एकर जागेत उभे केले जाणार आहे. या रूग्णालयासाठी करण्यात येणाऱ्या विद्युत कामासाठी एमईपी सिस्टीम सोलुशन्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्तीस स्थायी समितीने बुधवारी (दि.15) झालेल्या सभेत ऐनवेळी मंजुरी दिली.
रूग्णालयासाठी विद्युतीकरण करणे, जनरेटर बसविणे, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, पाण्याचे पंप, वॉटर हिटर, वॉटर प्युरिफायर, अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविणे आदी कामाचे नियोजन करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या कामाच्या मोबदल्यात सल्लागारास केवळ एक रूपया मानधन दिले जाणार आहे.
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील विविध टाक्यांवरुन पाणीपुरवठा करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या 2 कोटी 26 लाख इतक्या खर्चासह एकूण 3 कोटी 18 लाख खर्चास समितीने मंजुरी दिली. कोविड केअर सेंटर व इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन सेंटरमधील रूग्ण व नागरिकांना प्रति व्यक्ती 250 रूपये दराने जेवण व नाश्ता देण्यात आला. त्यासाठी 25 मार्च ते 15 जून या कालावधीसाठी आलेल्या 25 लाख 41 हजार 541 खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. तसेच, मागील वर्षातील विविध विभागाची बिले अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
तसेच, पालिकेच्या सीएसआर ऍक्टिव्हिटी अंतर्गत श्रृतिका बाग मुंगी यांची कॉर्पोरेट सोशल वर्कर म्हणून 6 महिने कालावधीसाठी नियुक्ती करण्यास समितीने ऐनवेळी मंजुरी दिली. त्यांना दरमहा 40 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून ओमप्रकाश बहिवाल यांना दरमहा 40 हजार रूपये मानधनावर 6 महिन्यांसाठी नियुक्तीस मंजुरी देण्यात आली.