उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २९ रोजी पुरस्कार वितरण
कोरेगाव – करोनासारख्या जागतिक संकटामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात काडसिध्द कोविड सेंटर्स सुरु करुन हजारो रुग्णांचे प्राण वाचविणार्या काडसिध्द कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. प्रिया शिंदे व डॉ. अरुणा बर्गे यांच्या कार्याची दखल डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेने घेतली असून त्यांना मानाचा राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य व मान्यवरांच्या हस्ते २९ जानेवारी रोजी कणेरी मठ, कोल्हापूर येथे सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यातील पत्रकार व संपादकांची अग्रेसर संघटना असलेल्या डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेने डॉ. प्रिया शिंदे व डॉ. अरुणा बर्गे यांच्या कार्याची दखल घेऊन महागौरव २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य संघटक सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, राहिद सय्यद, अमोल टकले, सचिव राहुल ताटे, खजिनदार संदीप माने, सोमनाथ साखरे, संतोष शिराळे, सुर्यप्रताप कांबळे उपस्थित होते.
दि. २९ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सिध्दगिरी कण्हेरी मठ येथे डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय दुसर्या महाअधिवेशनामध्ये डॉ. प्रिया शिंदे व डॉ. अरुणा बर्गे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोल्हापूर संस्थानचे अधिपती श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री, आमदार महेश शिंदे, आमदार सतेज तथा बंटी पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. श्रीनिवास पाटील, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, महाराष्ट्राच्या आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, ख्यातनाम निर्माता, दिग्दर्शक, लेखक व अभिनेता गिरीश कुलकर्णी आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.