खंडाळा – सोन्याचे दागिने व बिस्किट बनवण्यासाठी पैसे घेऊनआर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडाळा येथील वैभव गोल्डन ज्वेलर्स दुकानाचे मालक व त्यांची पत्नी या दांपत्याविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव गोल्डन ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी नीलम वैभव धामणकर या दोघांनी सैन्य दलातील सेवानिवृत्त रामदास किसन रामगुडे (मूळ रा.बावडा ता. खंडाळा सध्या रा.रणदुल्लाबाद ता. कोरेगाव) यांना सोन्याचे बिस्किट व दागिने करून देतो असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या दांपत्याने 2009 ते 2019 या कालावधीत किसन रामुगडे यांच्याकडून 31 लाख 2 हजार 248 रुपये इतकी रक्कम घेतली. परंतू, त्या बदल्यात रामगुडे यांना सोन्याचे दागिने किंवा बिस्किट काहीच दिले नाही.
या सर्व प्रकारामध्ये आर्थिक फसवणूक झाल्याचे रामगुडे यांच्या लक्षात आले. संबंधित ज्वेलर्स मालकाकडून इतर लोकांचीही आर्थिक फसवणूक झाल्याचे कळाल्याने रामगुडे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत रामदास रामगुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वैभव धामणकर व नीलम धामणकर या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील शेळके करत आहेत.
यापूर्वीही गुन्हे दाखल..
वैभव गोल्डन ज्वेलर्सचे मालक धामणकर पती-पत्नी यांच्यावर यापूर्वीही लोकांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत. अजूनही अनेक व्यक्ती तक्रार करण्याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचीही चर्चा चालू आहे तसेच या फसवणुकीबाबत यापुढेही तक्रारदार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.