वडगाव मावळ – गेल्या वर्षभरात घडलेल्या खुनांच्या घटनांमुळे मावळ तालुका हादरून गेला. यामुळे तालुक्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून आले. ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘मोका पॅटर्न’ राबवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात पिंपरी चिंचवड शहरातील ५१ टोळ्यांवर ‘मोका’ची कारवाई केली आहे. २०२३ या वर्षात मावळ तालुक्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हददीतील तब्बल आठ टोळ्यांतील तब्बल ७३ सराईत गुंडावर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) नुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांची एकच पळापळ झाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सध्या तालुका शांत असल्याचे दिसून येते.
१ एप्रिल २०२३ रोजी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आला. त्यानंतर १२ मे रोजी जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा तळेगाव नगरपरिषदेच्या आवारात खून करण्यात आला. एकामागोमाग घडलेल्या राजकीय नेत्यांच्या हत्यासत्रामुळे मावळ तालुका हादरून गेला. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी आणखीनच कडक पावले उचलण्यास सुरवात केेली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील १२ महिन्यांच्या कालावधीत ५१ गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिल्याने गुन्हेगारांची पळापळ सुरु झाली आहे.
सततच्या टास्कमुळे गुन्हेगार सैरभैर
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी आयुक्त पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर वर्षभरात त्यांनी अंतर्गत स्पर्धा लावून विविध उपक्रम राबवले. त्यामुळे गुन्हेगारी कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी हातात शस्त्र घेऊन राडा घालणारे टोळके तसेच खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेच्या विविध पथकांसह पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांनाही ‘अॅक्टिव्ह’ करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगार गजाआड होण्याचे देखील प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
गुन्हेगार निगराणी योजना
पोलीस ठाणेनिहाय हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर वॉच ठेवल्याने दरम्यानच्या काळात याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जामिनावर बाहेर आलेले पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट, डीपी, प्रोफाइल, कमेंट यावरही पोलिसांची बारीक नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियातून दहशत पसरविणाऱ्यांवरही कारवाईचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण पोलिसांकडून कारवाई कमी
पुणे ग्रामीण पोलिसांनी सध्या अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगाारला आहे. मात्र एमपीडीए, मोका, तडीपार अशा प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ग्रामीण पोलीस पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
आकडे बोलतात वर्ष टोळ्या गुन्हेगार
२०१८ ०१ ०७
२०१९ ०९ ५९
२०२० ०९ ५०
२०२१ २६ १८७
२०२२ १८ १२९
२०२३ ५१ ३५७
मावळातील २०२३ मधील मोकांतर्गत कारवाई
पोलीस ठाणे टोळ्या गुन्हेगार
तळेगाव ४ ४८
शिरगाव २ १३
देहूरोड १ ०५
तळेगाव एमआयडीसी १ ०७
एकूण ८ ७३