पुणे – नव्या वर्षात महापालिकेचा दैनंदिन कारभार आणखी गतीमान करण्यासाठी महापालिकेच्या सर्व ६० विभागांमध्ये ई- फायलिंग प्रकल्प सुरू केला जाणार आहे. सध्या केवळ १६ विभागांंमध्ये हा प्रकल्प सुरू असून मार्च २०२४ अखेरीस सर्व कार्यालयात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली असून याबाबत सूचना दिल्या आहेत. या प्रणालीचा वापर महापालिका आयुक्त कार्यालयातही सरू असून या प्रणालीमुळे फाईलचा सर्व प्रवास आॅनलाईन होणार आहे.
काय आहे ई – अॉफिस प्रणाली?
महापालिकेकडून ‘इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रत्येक विभागनिहाय नोंदी अपलोड करण्यात येणार असून, अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध आहे का, याची चाचपणी केली जाणार आहे. प्रत्येक कामासाठीचे निश्चित करण्यात दर सूत्रानुसार त्याचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार केले जात आहे.
त्याचाच, पुढचा भाग ई- अॅफिस प्रणाली असून यात महापालिकेकडून तयार करण्यात आलेला प्रस्तावाची फाईल ही कागदावर मान्यता तसेच निविदने घेऊन टाईप केलेली असते. तर प्रत्येक विभागात ही फाईल नवीन कागद वाढवित पुढील मान्यतांसाठी पाठविली जाते, अशा वेळी अनेकदा फाईल गहाळ होतात अथवा हेतूपरस्पर लपविल्या जातात.
मात्र, ई- अॅफिस प्रणालीत संपूर्ण फाईल आॅनलाईन स्वरूपात प्रत्येक विभागात पाठविली जाते तसेच त्यावर अधिकारी ई- स्वाक्षरी करतात तसेच ही फाईल आॅनलाईन असल्याने ती कोणत्या विभागात, कोणत्या अधिकार्याकडे आहे याची माहितीही एका क्लीकवर मिळते. परिणामी, अनेक गैरप्रकार रोखण्यासह कामात गतीमानता येते.