करोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. प्रगत म्हणणाऱ्या देशाच्या आरोग्य व्यवस्थांनी पण करोनापुढे हात टेकले. या करोना संसर्गाच्या मुकाबल्यासाठी तुमच्या शरिरातील प्रतिकार शक्ती अधिक असणं सर्वात मोठी शक्ती आहे. करोना विषाणू नवीन असल्यामुळे आपल्या शरिरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींना याची ओळख नाही. त्यामुळे यावर सध्या जे काही प्राथमिक उपचार आहेत, त्यात “प्लाझ्मा’ थेरपी हा एक उपचार आहे. नेमकी काय आहे ही “प्लाझ्मा’ थेरपी यावर प्रकाश टाकणारा हा लेख. तुम्ही जर करोनामुक्त असाल तर व्हा “प्लाझ्मा’ दाते…!
करोना पॉझिटिव्ह उपचारानंतर तुम्ही पूर्ण बरा झालात. यादरम्यान तुमच्या शरीरात करोना विषाणूचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके (रपींळलेवळशी) तयार होतात. तसे तयार झालेले प्रतिजैविके फेरोसिस प्रक्रियेद्वारे आपल्या रक्तातील “प्लाझ्मा’ वेगळा करुन अन्य गंभीर करोना रुग्णाला दिल्यास त्याच्या शरीरात ही प्रतिजैविके जाऊन त्याला करोनाविरुद्ध लढायला मदत करतात.
त्यासाठी करोनामधून बरे झालेल्या रुग्णांनी 28 दिवस ते चार महिने या कालावधीत “प्लाझ्मा’ दान करणे आवश्यक असतं. “प्लाझ्मा’ दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोन दिवस आधी जिथे व्यवस्था आहे त्या रक्तपेढीत बोलावून रक्ताचे नमुने घेण्यात येतात. या नमुन्याच्या चाचण्या झाल्यानंतर तुम्ही “प्लाझ्मा’ दान करु शकता की नाही हे डॉक्टर सांगतात.
प्लाझ्मा देण्यायोग्य असेल तर डॉक्टर दान करायला सांगतात.
प्लाझ्मा देणे ही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. मात्र त्यासाठी फेरोसिस मशिन वापरावे लागते. या मशिनमध्ये आपल्या शरीरातील रक्त काढले जाते. मशिनमध्ये रक्ताचे पृथ्थकरण होऊन त्यातला प्लाझ्मा वेगळा केला जातो.
तर रक्तातील उर्वरित घटक जसे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आदी पुन्हा आपल्या शरीरात सोडले जातात. हे एकाच वेळी होत असते. अवघ्या तास दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण करुन आपण घरी परत येऊ शकतो. प्लाझ्मा दान केल्यावर आपण स्वतः आराम करणे आवश्यक असते. किमान दिवसभर श्रमाचे काम करु नये, असा सल्ला डॉक्टर देतात. दान केलेल्या प्लाझ्माची पातळी पूर्ववत भरुन येण्यासाठी 12 तासांचा कालावधी पुरेसा असतो.
संकलित केलेला प्लाझ्मा अत्यवस्थ वा गंभीर करोना रुग्णाला दिला जातो. हे करताना दात्याचे व ज्या रुग्णाला प्लाझ्मा दिला जातोय, अशा दोघांचे नाव गोपनीय ठेवले जाते. मात्र, प्लाझ्मा दाता आणि रुग्ण यांचा रक्तगट एकच असणे आवश्यक आहे. हा प्लाझ्मा संबंधित रुग्णाच्या शरीरात सोडल्यानंतर “प्लाझ्मा’मधील तयार प्रतिजैविकांची फौज करोनाविरुद्ध लढायला मदत करते.
“प्लाझ्मा’ दान करणे हे आताच्या घडीला खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे. त्यामुळे जे करोनामुक्त झाले आहेत, त्यांनी अवश्य प्लाझ्मा दान करावे. कोणाचा तरी जीव वाचवण्यात आपला तेवढाच हातभार लागतो. अनेक जण आता “प्लाझ्मा’ दानासाठी पुढे येत आहेत. तुम्हीही करोनामुक्त असाल तर पुढे या आणि “प्लाझ्मा’ दान करा…असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील यांनी केले आहे आणि त्यांनीही दान करणार असल्याचे सांगितले आहे. करोनामुक्ती ते “प्लाझ्मा दाता’ हे तुमच्यासाठी जीवन अनुभव असेल हे नक्की.!
– युवराज पाटील
(जिल्हा माहिती अधिकारी, सातारा)