आरोग्य विभागाचे आवाहन : मेडिकलमध्ये चिठ्ठीशिवाय औषधे मागू नयेत
पुणे – शहरासह राज्यात करोना विषाणूच्या आजारावर अजून ठोस औषध उपलब्ध नाही. त्यामुळे या आजाराची लागण आपल्याला होऊ नये, यासाठी नागरिकांकडून सतर्कता बाळगली जात असून, या विषाणुची भीतीही मनात बसलेली आहे. मात्र, दोन दिवसांपासून या आजारावर “हायड्रोक्लोरोक्विन’ औषध दिले तरी चालेल, असा सूचना “आयसीएमआर’कडून देण्यात आल्या आहेत. मात्र, हे वृत्त नागरिकांपर्यंत समाजमाध्यमांमधून पोहचताच नागरिक भीतीपोटी हे औषधे खरेदी करण्यासाठी मेडिकलमध्ये गर्दी करत आहे. परंतू, ज्या व्यक्तीला हा आजार नाही आणि घाबरून विनाकारण औषध घेतले तर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
संबंधित सूचवण्यात आलेले औषध हे मलेरियावरचे आहे. करोनाबाधित व्यक्तीला हे औषध देण्याबाबत “आयसीएमआय’कडून सूचना आल्यानंतर त्याचा वापर केला जात आहे. मात्र, याबाबत सोशल मीडियावर माहिती पसरताच नागरिकांनी थेट मेडिकल गाठत हे औषध खरेदी करत आहे. सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असल्यास नागरिकांकडून भीतीपोटी या औषधांचा सर्रास वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे मेडिकलमध्ये ही औषधे चिठ्ठीशिवाय दिली जात असल्यामुळे सध्या या औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
जो व्यक्ती करोनाबाधित किंवा संशयित आहे, अशाच रूग्णांना “हायड्रोक्लोरोक्विन’ औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यायचे आहे. त्यामुळे केवळ सर्दी, घसा दुखतोय अशी लक्षणे दिसली तर लगेच ही औषधे घेऊ नयेत. करोना संशयित कोणतेही लक्षण दिसल्यास त्यासंबंधी तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच यावर उपचार घ्यावेत. परस्पर ही औषधे घेतल्यास त्याचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो, याची खबरदारी नागरिकांनी वेळीच घ्यायची आहे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय