काहीही करा, पण आमच्या घरी चला

सातारा – काहीही करा पण आमच्या घरी चला, असा बालहट्ट करत काटेवाडी येथील शेतकऱ्याच्या लेकीने उद्धव ठाकरेंना गळ घातली. त्यावर आत्ता नाही परंतु परत आल्यानंतर मी नक्की येईन अशी मनधरणी त्यांनी केली. मात्र, मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही घरी चलाच या एकाच गोष्टीवर अडून बसत शेतकऱ्याच्या या लेकीनी उद्धव ठाकरे यांना आपल्या घरी नेलेच. कांचन भानुदास कोरडे असे या शेतकऱ्याच्या लेकीचे नाव आहे. उद्धव ठाकरे यांनी बापाच्या मायेने शेतकऱ्यांच्या लेकीचा पुरविलेल्या या बालहट्टामुळे त्यांच्यातील हळव्या मनाचे दर्शन उपस्थितांना झाले.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करुन आढावा घेतला. खटाव तालुक्‍यातील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांशी ते संवाद साधत असताना मला साहेबांना भेटायचे आहे असे म्हणत कांचन कोरडे ही शेतकऱ्याची लेक गर्दीतून वाट काढत होती. अनेकांनी तिला पुढे न जाण्याचा सल्लादेखील दिला. मात्र मला चेंगरले तरी चेंगरु देत, पण मला साहेबांना भेटायचेच आहे, असे म्हणत ती पुढे सरकत होती.

कशीबशी ती उद्धव ठाकरे यांच्या गाडीजवळ पोहोचलीही, मात्र तिथे उभे असलेले सुरक्षारक्षक तिला पुढे जाऊ देत नव्हते. मात्र उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा हट्ट काही कांचन हिने सोडला नाही. हा सर्व प्रसंग उद्धव ठाकरे यांनी पाहिला आणि त्यांनी कांचनला पुढे बोलावत तुझा काय प्रश्‍न आहे हे विचारले. त्यावर “काहीही करा पण आमच्या घरी चला’ असा हट्ट तिने केला. काही केल्या कांचन ऐकत नव्हती. त्यावर आत्ता नाही परंतु, पुढच्यावेळी नक्की येईन असे ठाकरे यांनी समजावले. मात्र “मी तुम्हाला जाऊन देणार नाही, तुम्ही आमच्या घरी यायलाच पाहिजे’ असा एकच हट्ट तिने सुरु केला.

अखेर उद्धव ठाकरे यांनीही तिचं मन न मोडता अखेर कांचनला आपल्याच गाडीत बसवत तिचे घर गाठले, घरी गेल्यावर कांचनसह घरातील सर्वांनीच उद्धव यांचे औक्षण करुन आदरातिथ्य केले. कांचनच्या कुटुंबियांचे हे आदरातिथ्य पाहून उद्धव ठाकरेही भारावले. त्यानंतर कुटुंबियांसमवेत फोटो काढून ते पुढच्या दौऱ्याला निघाले. राजकीय व्यासपीठावरुन विरोधकांवर शाब्दिक बाण सोडणारे, आपल्या कणखर भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी साताऱ्यातील शेतकऱ्याच्या लेकीचा बापाच्या मायेने पुरवलेला हट्ट हा त्यांच्या हळव्या मनाचे दर्शन घडवून गेला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)