खंडणीखोरांची मस्ती; व्यापाऱ्यांना धास्ती

* वर्षभरात तब्बल 7 व्यापाऱ्यांकडे फोनवरून पैशांची मागणी
* मागील 10 दिवसांत पैशांसाठी दोघांना धमक्‍या
* मार्केट यार्डातील दहशत मोडून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान

संजय कडू
पुणे  – भुसार व भाजीपाल्याची राज्यातील मोठी बाजारपेठ पुणे बाजार समिती परिसरात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यातील अनेक व्यापाऱ्यांची महिन्याची उलाढालही कोटींच्या घरात आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात बॅंका आणि पतसंस्थांचे जाळे आहे. मार्केटयार्डातील व्यापाऱ्याचे अपहरण करुन दीड कोटी रुपयांची खंडणी उकळण्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. व्यापाऱ्याची सुखरुप सुटका करुन खंडणीची रक्कमही प्राप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, भीती कमी करण्यासाठी पोलिसांना काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्‍यक आहे.

मार्केट यार्डातील खंडणीच्या घटनांचा आढावा घेतला असता, मागील दहा दिवसांत व्यापाऱ्यांनी दोन खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. तर वर्षभरात तब्बल सात व्यापाऱ्यांना फोनवरुन धमकावण्यात आले आहे. गुरुवारी-शुक्रवारी अशाच एका प्रकरणात दीड कोटी रुपयांसाठी कांतीलाल गणात्रा यांचे अपहरण करण्यात आले होते. ते आता सुखरूप आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत दि.7 नोव्हेंबर रोजी येथील एका बड्या व्यापाऱ्याला 5 लाखाच्या खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. त्यांच्या घरातील किचनच्या दरवाजावर बाहेरील बाजूस

“5 लाख रुपये पाहिजेत अन्यथा सर्वांना मारुन टाकले जाईल’ असे इंग्रजी भाषेतील धमकीवजा पत्र चिटकवण्यात आले होते. तर, मागील वर्षभरात सात व्यापाऱ्यांना पैशांसाठी फोनवरुन धमकावण्यात आल्याचे गुन्हे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बहुतांश व्यापारी जीवाच्या धोक्‍याने तक्रार देण्यास धजावत नाहीत. किरकोळ रक्कम असेल, तर ती देऊन गप्प बसतात. शुक्रवारच्या घटनेतही व्यापारी कांतीलाल गणात्रा यांच्या कुटूंबाने जीवाच्या भीतीने तब्बल दीड कोटींची रक्‍कम काही तासांत अपहरणकर्त्यांना दिली होती.

व्यापाऱ्यांनी घ्यावी काळजी
भुसार बाजारातील व्यापाऱ्यांकडे कोट्यवधींची उलाढाल असते. दररोजचे व्यवहार तेथील कामगारांना माहिती असतात. तसेच व्यापऱ्यांची दैनंदिनी आणि पैसे बॅंकत भरण्याच्या वेळाही माहिती असतात. यामुळे व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे, सीसीटीव्ही बसवणे व पैसे ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रुम बनवणे आवश्‍यक आहे.

भुसार बाजारात जवळपास 600 व्यापारी आहेत. येथे वर्षभरात 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. बाजार समितीच्यावतीने परिसरात 200 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. भुसार बाजारात दिवसा व रात्री पोलिसांची गस्त वाढवावी, असे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे
-पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पुना मर्चंट चेंबर

शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी सराईतांची गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांकडून झडती सुरू आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, तडिपारी असा धडाका लावल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह गणेशोत्सव शांततेत झाला. मागील वर्षभरात 159 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून दीड वर्षांत 193 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मार्केटयार्डातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातही योग्य तो विचार केला जाणार आहे.
– रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त.

Leave A Reply

Your email address will not be published.