पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यंदा जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात बारामती मतदारसंघाची तर दुसऱ्या टप्प्यात पुणे, मावळ आणि शिरुर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
बारामती लोकसभेसाठी दि.12 एप्रिल 2024 पासून तर पुणे, मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी दि.18 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहेत, ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे अधिकारी- अजय मोरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहे, यामध्ये पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, मदतकक्ष असणार असेल. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.
तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “पुणे शहर हद्दीत 3 हजार 287 मतदान केंद्रांचा समावेश होतो. या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेची पूर्वतयारी झाली आहे. प्रशासनाला सात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांची स्थापनादेखील करण्यात आली आहे.’
पुणे जिल्ह्यातील निवडणुकीची वैशिष्ट्ये
– एकूण मतदार – 82 लाख 24 हजार 423
– एकूण मतदान केंद्र- 8 हजार 382
– एकूण मनुष्यबळाची आवश्यकता – 69 हजार 762
– संवेदनशील मतदान केंद्र संख्या – 20
– 18 ते 19 वयोगटातील मतदार – 84 हजार 50
– 20 ते 29 वयोगटातील मतदार – 13 लाख 42 हजार
– 100 पेक्षा अधिक वयाचे मतदार – 5 हजार 517
– एकूण दिव्यांग मतदार – 85 हजार