अतिरिक्त आयुक्त गेले सभा सोडून; सत्ताधारी नगरसेवकाशी शाब्दिक चकमक
पुणे – पुणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राजा बराटे यांचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्याबरोबर जोरदार शाब्दिक वाद झाल्याने गोयल हे बैठकीतून निघून गेले. त्याबरोबरच अन्य अधिकाऱ्यांनीही बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र, आयुक्त शेखर गायकवाड स्वत: बैठकीला आले, त्यानंतर काही अधिकारी बैठकीला आले.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सुरू होण्याआधी बराटे हे अध्यक्ष हेमंत रासने यांना भेटण्यासाठी आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोयल यांनी माझ्या प्रभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 50 लाख रुपयांचे काम रोखले असल्याची तक्रार बराटे यांनी रासने यांच्याकडे गेली. त्यावेळी गोयल हे बैठकीच्या सभागृहात आले आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. एकेरी उल्लेख केल्याने गोयल बैठकीतून उठून गेले. त्यापाठोपाठ महापालिकेच्या अन्य अधिकारीही त्यांच्यामागे गेले.
गेल्या दोन महिन्यापासून माझ्या योजना थांबवल्या जातात. माझ्या प्रभागात महाविद्यालये आहेत. तेथे विद्यार्थीनींची संख्याही जास्त आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक आहे आणि तोच निधी रोखला गेला त्याचा जाब विचारला आहे मी कोणालाही शिवीगाळ केली नाही, असे बराटे यांनी सांगितले.
या प्रकरणाचे पडसाद लगेचच झालेल्या मुख्यसभेत पडले. हा प्रकार झाला तरी गुन्हा दाखल केला नाही, आणि काही महिन्यांपूर्वी आम्ही आंदोलन केले तर आम्हांला अटक झाली, असा प्रश्न कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. आमच्या एका नगरसेवकांला येरवडा कारागृहात राहावे लागले. हे आम्हाला भोगायला लागले. आता अधिकाऱ्यांना पिस्तूल दाखवले तरी सरकारी कामकाजात अडथळा नाही का, असाही सवाल शिंदे यांनी केला. त्यावर तुमच्यावेळी चूक झाली असेल आता मात्र हे प्रकरण मिटले आहे, असे सांगत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.