पुणे – पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी असलेले भीमाशंकर मंदिराच्या (Bhimashankar) परिसरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पुजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच पुजाऱ्यांच्या गटात हाणामारी सुरु असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणी खेड पोलीसात 36 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात पूजेच्या अधिकारावरून गुरवांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, भाविकांची दर्शनासाठी रांग सुरु होती. काही पुजारी मंदिर गाभाऱ्यात पाटावर पुजेसाठी बसलेले होते. यावेळी दुसरा गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात घुसला. पाटावर बसलेले पुजारी विजय कौदरे यांना दमदाटी करू लागले. त्यांना पाटावरून उठवले आणि शिविगाळ करून धक्काबुक्की केली. हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार गौरक्ष कौदरे यांनी दिली असून त्यावरून एका गटाच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शंकर कौदरे यांच्या तक्रारीनुसार 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोदरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले की, मंदिरात पुजेच्या कारणावरून प्लास्टिक खुर्ची आणि लोखंडी पाईपने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसते ?
काही पुजारी आपापसात हाणामारी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. सदर ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित असून ते एकमेकांना मारहाण करणाऱ्या पूजाऱ्यांना आवर घातलाना दिसत आहेत. मात्र पुजारी पोलीस कर्मचाऱ्यांना न जुमानता शिवीगाळ करत एकमेकांवर धावून जात असल्याचे दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, देवावर फुले वाहणाऱ्या आणि इतरांना शांतीचा, भक्तीचा संदेश देणारे पुजारीच पुजेच्या अधिकारावरून आपापसात भांडण करत असतील, एकमेकांना शिवीगाळ करत असतील तर भक्तांनी त्यांच्याकडून काय बोध घ्यावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
अरे देवा, मंदिरातील गुरवांच्या दोन गटांत पुजेच्या अधिकारावरुन जोरदार हाणामारी, गुन्हा दाखल pic.twitter.com/r35SEI8E4C
— jitendra (@jitendrazavar) October 17, 2023