मुंबई :- परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्कंठा सगळ्यांनाच असली तरी त्यातून लाभ मात्र या सामन्याचे प्रक्षेपण करत असलेल्या हॉटस्टार या वाहिनीला होणार आहे. आशिया करंडक स्पर्धेत शनिवारी होत असलेल्या या सामन्याद्वारे या कंपनीने जाहिरातींच्या माध्यमातून तब्बल 400 कोटी रुपये कमावण्याचे ध्येय साध्य होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
2 सप्टेंबरला होत असलेल्या या सामन्यात 10 सेकंदाच्या जाहिरातीचे हक्क तब्बल 30 लाख रुपयांना विकले गेले आहेत. या स्पर्धेतील अन्य लढतींसाठीचा दर मात्र, 10 सेकंदाला 2 ते 3 लाख रुपयांना विकले गेले आहेत.
या कंपनीने या स्पर्धेसाठी तीन प्रकारची पॅकेज उपलब्ध केली आहेत. यातील पहिले पॅकेज भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यांच्या दराचे आहे. दुसरे पॅकेज भारताच्या अन्य संघांशी होत असलेल्या सामन्यांच्या दराचे आहे तर तिसरे पॅकेज हे नॉन इंडिया सामन्यांचे आहे.
या स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीत एक लढत होत असून दोन्ही संघ सुपर फोर गटातही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तसेच हेच दोन संघ अंतिम फेरीत आले तर आणखी एका सामन्याची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे. म्हणजेच या तीन सामन्यांतूनच हॉटस्टार तब्बल 1200 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज असून अन्य सामन्यांमधून मिळणारी कमाई देखील वेगळी असेल.
एकूणच यंदाची आशिया करंडक स्पर्धा या कंपनीसाठी किमान 1500 कोटी रुपये मिळवून देणारी ठरेल असे सध्या तरी चित्र दिसत आहे.
या कंपनीने या स्पर्धेसाठी कोको कोला, अमुल, मॅकनोरे, नेरोलॅक पेंट, बर्जर पेंट या मोठ्या ब्रॅंडशी करार केला आहे. तसेच जिंदाल पॅंथर, सॅमसन मोबाइल, एमआरएफ टायर्स, मारुती सुझुकी, अमेझॉन पे, माय 11 सर्कल, पॉलिसी बाझार, आयसीआयसीआय म्युचअल फंड यांच्याशीही ठरावीक सामन्यांसाठी करार केले आहेत.